
बाळासाहेब सुतार
नीरा नरसिंहपूर प्रतिनिधी
इंदापूर तालुक्यातील महात्मा फुलेनगर (बिजवडी) येथील कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखान्याकडून आगामी गळीत हंगाम 2023-24 साठी ऊस बिलाचा पहिला हप्ता रु. 2500 प्रमाणे दिला जाईल, त्यानंतरचे ऊस बिलाचे पुढील हप्ते इतर कारखान्यांप्रमाणे दिले जातील. कर्मयोगी शंकररावजी पाटील कारखाना आगामी गळीत हंगामात ऊस दरात आघाडीवर राहील, अशी ग्वाही कारखान्याचे अध्यक्ष व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी सोमवारी (दि.30) दिली.
कर्मयोगी कारखाना चालू गळीत हंगामामध्ये कितीही अडचणी आल्या तरी 9 लाख मे. टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट आपल्या सर्वांच्या सहकार्याने निश्चितपणे पूर्ण करेल. त्या दृष्टीने संचालक मंडळाने नियोजन केले असून, कारखान्याची सर्व यंत्रणा पुर्णपणे सज्ज झाली आहे. कारखाना आर्थिक दृष्ट्या सुस्थितीत असून गळीत झालेल्या ऊसाची तसेच तोडणी व वाहतूकीची सर्व बीले वेळेवर व काटेकोरपणे हंगाम संपेपर्यंत दिली जातील
तसेच कर्मचाऱ्यांचे पगार दर महिन्याला नियमितपणे होत असून दिवाळीसाठी एक महिन्याचा पगार बोनस म्हणून दिला जाणार आहे, असेही हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले.
यावेळी वसंत मोहोळकर, पराग जाधव, प्रदीप पाटील, हनुमंत जाधव, छगन भोंगळे, अंबादास शिंगाडे, भूषण काळे, राहुल जाधव, शांतीलाल शिंदे, रवींद्र सरडे, विश्वास देवकाते, निवृत्ती गायकवाड, प्रवीण देवकर, रतन देवकर, केशव दुर्गे, सतीश व्यवहारे, हिरा पारेकर, शारदा पवार, कांचन कदम, कार्यकारी संचालक देवराव लोकरे उपस्थित होते.