डॉ.देखणे म्हणजे संतसाहित्य आणि लोकसाहित्य यांचे अनुबंध जोडणारा दुवा :- खासदार श्रीनिवास पाटील… — डॉ.रामचंद्र देखणे यांच्या “लोकसाहित्यातील गण” पुस्तकाचे प्रकाशन…

दिनेश कुऱ्हाडे

उपसंपादक

पुणे : संतसाहित्य, लोकवाङ्मय अतिशय प्रगल्भ आहे. यातील नेमके काय घ्यावे आणि ते सहजसोप्या भाषेत लोकांपर्यंत पोहोचावे, यासाठी डॉ. रामचंद्र देखणे अखेरच्या श्वासापर्यंत कार्यमग्न राहिले. त्यांनी आयुष्यभर संतसाहित्याचा भावार्थ सांगितला. तो वारसा पुढच्या पिढीलाही दिला,” संतसाहित्य आणि लोकसाहित्य यांचे अनुबंध जोडणारा महत्त्वाचा दुवा म्हणजे डॉ.रामचंद्र देखणे होते असे प्रतिपादन माजी राज्यपाल व खासदार श्रीनिवास पाटील यांनी केले.

      वै.डॉ.रामचंद्र देखणे यांच्या देशविदेशात गाजलेल्या संतविरचित बहूरुपी भारुडाच्या कार्यक्रमाचा पुनःआरंभ तसेच विश्वकर्मा पब्लिकेशन्स प्रकाशित डॉ.रामचंद्र देखणे यांच्या “लोकसाहित्यातील गण” या ५२व्या पुस्तकाचे प्रकाशन सोहळा खासदार श्रीनिवास पाटील यांच्या अध्यक्षतेखाली डॉ.बाबा महाराज तराणेकर यांच्या हस्ते करण्यात आले.

       यावेळी माजी आमदार उल्हास पवार, डॉ.मदन महाराज गोसावी, प्रमोद महाराज जगताप, विशाल सोनी, प्रा.मिलिंद जोशी, संदीप तापकीर, डॉ.भावार्थ रामचंद्र देखणे, डॉ.रामचंद्र देखणे महाराज शिष्य परिवार, नागरिक बहूसंख्येने उपस्थित होते.

        श्रीनिवास पाटील यांनी डॉ.रामचंद्र देखणे यांच्या अनेक आठवणींना उजाळा दिला. रामचंद्राची वीणा भावार्थने हाती घेतली, पूजाने ती सांभाळली. देखणे कुटुंब आपलेपणाचा भाव जपणारे आहे. आपल्या प्रवचन, कीर्तन, भारुडातून त्यांनी लोकप्रबोधन केले, असे पाटील म्हणाले.