रूपेश बारापात्रे
शहर प्रतिनिधी
आरमोरी – शहरात व ग्रामीण भागात खुलेआम दारू विक्री जोरात चालू असल्याचे विदारक चित्र पाहायला मिळत आहे व हा घ्या पुरावा आजचं अस म्हणायची वेळ आली पण शासन स्तरावर कारवाई शून्य.
रक्षाबंधनाच्या औचित्याने “राखी विथ खाकी” कार्यक्रमाच्या माध्यमातून दारुविक्रेत्यावर कारवाई करु असे आश्वासन पोलीसदादा कडुन ओवाळणी स्वरुपात उपस्थित महिलां भगिनींना देण्यात आले होते.
पण आरमोरी शहरात अद्यापही सदर ओवाळणी रुपी आश्वासनाची अंमलबजावणी व पूर्तता होतांना दिसुन आलेली नाही. याउलट अवैध दारु विक्री संबंधाने सगळ काही ‘जैसे थे’ सुरु असल्याचे “याची देही याची डोळा” बघायला मिळत आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील तालुक्याचे ठिकाण व मुख्य बाजारपेठ असलेल्या आरमोरी शहरात अनेक अवैध धंद्यांना ऊत आले असून शहराच्या विविध ठिकाणी भरदिवसा चौकाचौकात देशी, विदेशी, मोह फुल दारुचा महापुर दिसुन येत असल्याचे पावलोपावली जाणवते आहे.
आज दिनांक अकरा ॲक्टोबर रोजी गडचिरोली आरमोरी मुख्य रस्त्यावर दारू पिऊन पडलेला इसम आढळला आणि पोलीस दादा ची आश्वासन ओवाळणी आठवली. दारुबंदी मुक्तिपथकाची कारवाई थंडावली की काय? असा यक्षप्रश्न उपस्थित होत आहे.
जिल्ह्यात १ एप्रिल १९९३ रोजी दारूबंदी करण्यात आली. मात्र, या निमित्ताने लपुन छपुन थोड्याफार प्रमाणात मद्य विक्री करणारे आज दारुचे ठेकेदार बनले आहेत. उलट आमचं कोण काय वाकडं करणार? या तोऱ्यात वावरतात व आजच्या स्थितीत आरमोरी तालुक्यात दारू ठेकेदाराचेराज असल्याचे जाणवू लागले आहे.
यामुळे तळीरामाची संख्या दिवसागणिक वाढताना दिसतो आहे. शिवाय अनेक कुटुंबाची वाताहात होत असुन अनेकांचे संसार उघड्यावर पडले आहेत. दारूमुळे अनेक तळीरामानी जीव गमावला असुन कित्येक कुटुंबाचा आधारवड कोलमडून पडला असुन अनेक कुटुंब पोरकी झाली असल्याची विदारक चित्रविचीत्र परिस्थिती बघायला मिळत आहे.
यावरुन असे लक्षात येते की जिह्यात दारूबंदी ही नावापुरतीच उरली असुन वास्तविकतेला मात्र वेगळेच वळण लागले असल्याचे दिसून येत आहे.
रक्षाबंधन दिनाचे औचित्य साधून आरमोरी पोलिस स्टेशन येथे मुक्तिपथ शहर व वॉर्ड संघटनेच्या संयुक्त विद्यमाने “राखी विथ खाकी” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी महिलांनी पोलिस दादांना राखी बांधून शहरातील व ग्रामीण भागातील अवैध दारूविक्री बंद करण्याची ओवाळणी मागितली आहे.
सोबतच पोलिस विभागाला निवेदन देऊन शहरासह ग्रामीण भाग दारूमुक्त करण्यासाठी प्रयत्न करण्याची मागणी सदर उपक्रमात उपस्थित असलेल्या महिलांनी केली आहे. पण अजुनही पोलीसदादानी कसलीही कारवाई केली असल्याचे जाणवत नाही.
सदर कार्यक्रमात उपस्थित असलेले आरमोरी शहराचे नगराध्यक्ष यांनी शहरातील वार्डा-वार्डातील अवैध दारू विक्री बंद करण्यासाठी नगरपरिषदेच्या विशेष सभेमध्ये चर्चा करून कारवाई करण्यासाठी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे.
सोबतच पोलिस अधिकाऱ्यांनी सुद्धा सकारात्मक प्रतिसाद देत महिलांच्या सहकार्याने विक्रेत्यांवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले असल्याचे समजते. पण अजुनही दारु माफीयांवर कसल्याही प्रकारचा कारवाईचा बडगा उगारल्याचे जाणवत नाही.
याउलट मद्दविक्री खुलेआम व बेलगाम, बेधडकपणे सुरु असल्याचे जाणवत असल्याने सर्वसामान्य नागरिकांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.
आरमोरी शहर तसेच तालुक्यातील ग्रामीण भागात जोपर्यंत अवैधरित्या धंदे करणाऱ्यां दारुमाफीया विरोधात धडक मोहीम राबवली जाणार नाही. तोपर्यंत शहराची प्रतिमा मलिन होतच राहणार यासाठी अवैधरित्या छुपेधंदे करणाऱ्यांचे मुसक्या आवळणे गरजेचे असल्याचे सर्वसामान्य नागरिकांकडुन बोलल्या जात आहे.
तद्वतच “राखी विथ खाकी” कार्यक्रमात देण्यात आलेल्या आश्वासनाची पूर्तता आश्वासनकर्ते यांचेकडून होणार की काय? सदर महिलांना रक्षाबंधन ओवाळणी मीडणार की काय? मद्य विक्रेत्ये व दारुचे ठेकेदार यांचेवर कठोर कारवाई होणार की काय? याकडे मुख्यतः महिलावर्ग तथा जनसामान्याचे लक्ष लागले आहे.