ऋषी सहारे
संपादक
गडचिरोली, दि. 30 : राज्यात बाल मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम राबविण्यात येत आहे. याच उपक्रमांतर्गत जिल्हा सामान्य रुग्णालय, गडचिरोली येथे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जिल्हा शल्य चिकित्सक डॉ प्रमोद बी खंडाते, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सतिशकुमार सोळंखे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ बागराज धुर्वे यांच्या नेतृत्त्वाखाली हृदयाचे आजार असलेल्या बालकांची २- DECHO तपासणी करण्यात आली.
नागपुर येथील किंग्स्वे रुग्णालयातील लहान मुलांचे ह्रदयरोग तज्ज्ञ डॉ. प्रणित लाले यांच्या उपस्थितीत सदर शिबीर पार पडले. शिबिरात जिल्ह्यातील एकूण १५२ बालकांची तपासणी करण्यात आली असून किंग्स्वे रुग्णालय, नागपूर येथे मोफत हृदय शस्त्रक्रियेसाठी गरजेनुसार पात्र ३८ बालकांना संदर्भित करण्यात येणार आहे.
राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमांतर्गत गडचिरोली जिल्ह्यातील २५ आरोग्य पथकांद्वारे वर्षातून २ वेळा अंगणवाडीतील व १ वेळा शाळेतील बालकांची नियमित आरोग्य तपासणी करण्यात येते. ० ते १८ वयोगटातील बालकांची ४-D म्हणजे जन्मतः व्यंग (Defect), पोषणमुल्यांची कमतरता (Deficiencies), शाररीक व मानसिक विकासात्मक विलंब (Developmental Delay), आजार (Diseases) यांचे निदान व उपचार करण्यात येतात. तसेच हृदयरोग तपासणी (२-D ECHO), नेत्र रोग, आकडी/फेफरे यांची मोठ्या प्रमाणावर शिबिरे आयोजीत करून निदान व औषधोपचार करण्यात येते. जिल्ह्यातील अनेक मुला-मुलींना या कार्यक्रमाचा मोफत लाभ झालेला असून त्यात अनेक जणांवर हृदय शस्त्रक्रिया व इतर शस्त्रक्रिया करण्यात आलेल्या आहेत.
जिल्ह्यातील अंगणवाडी तपासणी दरम्यान कुपोषित बालकांना निदान व औषधोपचार करून श्रेणीवर्धन करण्यासाठी पोषण पुनर्वसन केंद्र (NRC) महिला व बालरुग्णालय गडचिरोली येथे संदर्भित करण्यात येऊन त्यांच्या पालकास बुडीत मजुरीचा लाभ देण्यात येतो. तसेच जिल्हा शीघ्र हस्तक्षेप केंद्र (District early Intervention Center / DEIC) अंतर्गत • ते ६ वर्ष वयोगटातील ज्या बालकांना जन्मजात आजार, अवयवांच्या उणीवा आणि विकास/वाढीचा अभाव आढळल्यास त्यांच्यावर वेळीच शस्त्रक्रिया / औषधोपचार करून भविष्यात त्यांना शरीराच्या गुंतागुंतीच्या आजार किंवा उणीवापासून दूर ठेवणे शक्य होत आहे.
सदर शिबिरासाठी जिल्हा समन्वयक हेमलता सांगोळे, DEIC चे व्यवस्थापक प्रशांत खोब्रागडे तसेच राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमांतर्गत कार्यरत असलेले वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.