
दिनेश कुऱ्हाडे
प्रतिनिधी
मुंबई : राज्यातला बळीराजा अडचणीत असताना विद्यमान शिंदे सरकारला आपल्या संविधानिक कर्तव्याचा विसर पडला आहे अशी जोरदार टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी केली आहे.
गेले काही दिवस महाराष्ट्रातल्या अनेक भागांमध्ये अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे फळबागांचे व शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
त्यामध्ये द्राक्ष, काजू, संत्रा, केळी अशा फळांचा समावेश आहे. शेतकर्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतल्याचे चित्र पहायला मिळत आहे असेही महेश तपासे म्हणाले.
एकीकडे महाराष्ट्रातला शेतकरी उध्वस्त झालेला असताना राज्याचे मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री मंत्रिमंडळातील इतर मंत्री आमदार,खासदार हे बळीराजाला वाऱ्यावर सोडून प्रभू श्रीरामाच्या दर्शनाकरिता अयोध्येला गेले आहेत. प्रभू श्रीरामाचा आदर्श सांगणारे मुख्यमंत्री हे कर्तव्य विसरून राजकारणासाठी अयोध्येला गेले हे आज महाराष्ट्राने पाहिले असल्याचा आरोपही महेश तपासे यांनी केला आहे.
भक्ती भावाने एकटे गेले असते तर राज्यातील जनता समजू शकली असती परंतु संबंध मंत्रिमंडळ, आमदार,खासदार व कार्यकर्त्यांना घेऊन जाणे म्हणजे राजकीय स्टंटबाजी करणे असा त्याचा अर्थ होतो असा टोलाही महेश तपासे यांनी लगावला आहे.