प्रितम जनबंधु
संपादक
गडचिरोली जिल्ह्यात दारूबंदी असतानाही गावोगावी दारू मिळत असल्याचे चित्र दिसून येत आहे.त्यामुळे हीच काय दारूबंदी? असा सवाल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस डॉक्टर सेलचे सरचिटणीस डॉ. प्रमोद साळवे यांनी समस्त संबंधित यंत्रणेला उदेशुन केला आहे.
डॉ. साळवे यांनी पत्रकात म्हटले आहे की,गडचिरोली जिल्ह्यात संपूर्ण दारूबंदी आहे.वर्धा हा गांधी जिल्हा सोडून संपूर्ण महाराष्ट्रात दारू विक्री सुरू आहे.परंतु गडचिरोली जिल्ह्यात मुठभर मठाधिशांच्या फायद्यासाठी दारूबंदी सुरू असल्याचे दिसते.
कारण शासनातर्फे संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात दारूबंदी असली तरी गावोगावी हातभट्टीची दारू विक्री सुरू आहे.त्यामुळे अनेक लोकांचे संसार उघड्यावर पडत आहे.तसेच शासनाचा करोडो रुपयांचा महसूल बुडत आहे.
गावातील तरुण,शाळकरी मुले ही दारूसारख्या व्यसनाच्या आहारी जात असून त्यांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होत आहे.परंतु समाजमन व आरोग्याचा विचार न करता केवळ काही मठाधिशांच्या हव्यासापोटी या जिल्ह्यात दारूबंदी असल्याचे डॉ. साळवे यांनी म्हटले आहे.
जिल्ह्यात शासकीय दारूबंदी असली तरी गावोगावी हातभट्टीची दारू विकल्या जात आहे व तरुण पिढी व्यसनाच्या आहारी जात आहे, याला जबाबदार कोण? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.
गावोगावी हातभट्ट्या चालविल्या जात असल्याने तरुण पिढी वाम मार्गाला जाऊन जिल्ह्याला अधोगतीकडे नेण्यासाठी हे शास्त्रशुद्ध षडयंत्र तर नाही ना? याबाबत चौकशी होणे गरजेचे आहे.
याकरिता शासनाने त्वरित चंद्रपूर जिल्ह्याप्रमाणे येथील जनमानसाच्या मनाचा ठाव घेऊन विषारी दारूमुळे झालेले मृत्यू तसेच शासनाचा बुडालेला महसूल, दारूबंदीमुळे खरेच दारूबंदी झाली काय? दारूबंदीच्या आधी गडचिरोली जिल्ह्यात अवैध दारूविक्रीचे किती गुन्हे नोंदल्या गेले? दारूबंदी झाल्यानंतर आतापर्यंत दरवर्षी किती गुन्हे नोंदविल्या गेलेत या सर्व बाबींची चौकशी करुन दारूबंदी निर्णयाचे पुनरपरीक्षण करण्याकरिता तात्काळ उच्चस्तरीय समिती नेमावी,अशी मागणी डॉ. प्रमोद साळवे यांनी केली आहे. चंद्रपूर जिल्ह्याकरिता समिक्षा समिती नेमण्यात आली मग गडचिरोलीकरिता का नाही? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.