महागाईमुळे पुण्यातील 70 टक्के फोटो स्टुडिओ कायमस्वरूपी बंद…

दिनेश कुऱ्हाडे

उपसंपादक

पुणे : स्टुडिओच्या भाड्यात, वीज बिलात झालेली वाढ आणि वाढलेला व्यवस्थापनाचा खर्च अशा विविध कारणांमुळे पुण्यातील 70 टक्के फोटो स्टुडिओ कायमस्वरूपी बंद झाले आहेत. पुण्यात फक्त 30 टक्केच फोटो स्टुडिओ आता सुरू असून, फोटो स्टुडिओ चालविण्याचा खर्च वाढल्यामुळे अनेक छायाचित्रकारांनी स्टुडिओला कायमस्वरूपी टाळे लावले आहे.

          ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरी भागातील सर्वाधिक फोटो स्टुडिओ बंद पडले असून, कोरोनामुळे आर्थिक फटक्यातून सावरण्यासाठी अनेकांनी स्टुडिओच्या जागी दुसरा व्यवसाय सुरू केला आहे. तर काहींनी स्टुडिओ चालविण्यापेक्षा जोखीम पत्करून कमर्शिअल स्टुडिओकडे मोर्चा वळविला आहे. एरवी स्टुडिओमध्ये पासपोर्ट साइज छायाचित्रे काढणे, छायाचित्र अल्बमची कामे, छायाचित्र एडिटिंग, होत असतं.

         पण, तंत्रज्ञान बदलताना स्टुडिओचा व्यवसायही आता मागे पडला असून, पुण्यात कोथरूड, सिंहगड रस्ता, बाणेर, बावधन, कॅम्प आदी परिसरात असलेले स्टुडिओ बंद झाले आहेत. बदलत्या तंत्रज्ञानामुळे संगणकावर छायाचित्र एडिटिंग, फोटो प्रिंटरद्वारे छायाचित्र प्रिंट करणे अशी विविध कामे सोपी झाल्यामुळे अनेक छायाचित्रकार घरबसल्याही काम करत आहे.

      फोटो लॅबही पडल्या बंद

        पूर्वी फोटो स्टुडिओमध्ये छायाचित्र क्लिक केल्यानंतर तो पुढील प्रक्रियेसाठी फोटो लॅबमध्ये पाठविण्यात येत असे आणि त्यानंतर लोकांना त्यांची छायाचित्रे मिळत असतं. पण, तंत्रज्ञानात झालेल्या बदलांमुळे आणि फोटो प्रिंटरची सोय उपलब्ध असल्यामुळे फोटो स्टुडिओसह शहरातील अनेक फोटो लॅबही बंद पडल्या आहेत.

         पुणे फोटोग्राफर्स आणि व्हिडिओग्राफर्स असोसिएशनचे अध्यक्ष अभय काप्रे म्हणाले, कोरोनामुळे बहुतांश छायाचित्रकारांनी स्टुडिओ बंद केले आणि बघता बघता पुण्यातील 70 टक्के स्टुडिओ कायमस्वरूपी बंद पडले आहेत. देखभालीचा खर्च आणि भाडे परवडत नसल्याने, त्यात वीजबिलात झालेली वाढ, महागलेले छायाचित्रणाचे साहित्य यामुळे त्यांनी स्टुडिओ बंद केले आहेत. बहुंताश भाडेतत्त्वावर असलेले स्टुडिओ बंद झाले आहेत. तर काही छायाचित्रकारांनी त्याजागी दुसरा व्यवसाय सुरू केला आहे. काहींनी फ्लॅट विकत घेऊन किंवा भाडेतत्त्वावर घेऊन कमर्शिअल स्टुडिओ सुरू केले आहेत.

         फोटो स्टुडिओचालक परशुराम कमलाकर म्हणाले, फोटो स्टुडिओ चालविणे खर्चीक बाब आहे. सध्या स्टुडिओ बंद करून मी घरीच संगणकावर छायाचित्रणाशी संबंधित कामे करत असून, घरीच फोटो प्रिंटरद्वारे फोटो प्रिंट करूनही देत आहे.