कमलसिंह यादव
तालुका प्रतिनिधी पारशिवनी
पारशिवनी,:- विदर्भात गडचिरोली,चंद्रपूर मार्गे मान्सूनने प्रवेश केला आहे.पण नागपूर शहरासह जिल्ह्यात अद्यापही मान्सून सक्रिय झालेला नाही.
तरीही गुरुवार २२ जून २०२३ रोजी अचानक सायंकाळी पूर्व मान्सून पावसाने हजेरी लावली आणि काही प्रमाणात का असेना शेतकरी सुखावला.दरम्यान,गुरुवार नंतर शुक्रवारलाही दिवसभर पावसाने हजेरी लावली.
पावसाचे आगमन पाहताच चातकासारखी प्रतीक्षा करणाऱ्या बिटोली भागातील शेतकऱ्यांनी लगोलग कपाशीची पेरणी सुरू केली आहे.
गेल्या दोन महिन्यापासून शेतकरी नवीन हंगामाच्या तयारीला लागले आहेत.पारशिवनी तालुक्यातील बिटोली नेऊरवाडा भागात तूर,कपाशी आणि धानाची लागवड केली जाते.
जमिनीच्या कसदार पोत अंतर्गत पीक व्यवस्थित यावे म्हणून शेतकरी दरवर्षी पिकांचा फेरफार करतात असे या परिसरातील शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
एकसारखे पीक कायम ठेवले तर त्यातून उत्पादन कमी येण्याची शक्यता अधिक असते.यामुळे पिकांचा फेरफार करण्याची आमची पूर्वापार परंपरा असल्याचे प्रमोद निंबाळकर यांनी सांगितले.
यावर्षी कपाशीला भाव मिळाला नाही.तरीही पुन्हा एकदा बिटोली भागातील शेतकऱ्यांनी कपाशीलाच प्राधान्य दिले आहे.वस्तुतः शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये,असे कृषी विभागाने स्पष्ट केले आहे.
मात्र आम्ही आज कपाशी किंवा इतर पिकांची पेरणी न केल्यास पुढील काळात आमच्या हाती उत्पादन कमी येईल, अशीही भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
*****
समाधानकारक परिस्थिती नाही.
पावसाने भलेही हजेरी मारली. मात्र अद्यापही शेतातील जमीन आतून कोरडी आहे.जेव्हा आतील माती ओली होईल,तेव्हा समाधानकारक पाऊस मानला जाईल.
यामुळे आजतरी आमच्या भागातील शेतकरी समाधानी नाहीत,अशी माहिती बिटोलीचे प्रमोद निंबाळकर यांनी दिली.
पाऊस धो धो पडला तर तो धोकादायक असतो.त्यामुळे पाऊस रिमझिमसारखा पडला तरच शेतीला अधिक लाभदायक ठरेल.
*****
तालुक्यात शुक्रवारी झालेले पाऊस १६.५(३५.०५) इतका झाला. यात पारशिवनी भागात २४.१(५२.२), कन्हान भागात ६.३(७.३), आमडी भागात२२.२(४३.७) आणी नवेगांव भागात१३.०(३७.०) इतका पाऊस झाला असुन एकुण तालुक्यात १६.५,(३५.०५) पाऊस झाला आहे.