
दिनेश कुऱ्हाडे
उपसंपादक
पुणे : पुणे शहरातील नगर रोडवरील खराडी, चंदननगर परिसरात दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय पुणे महापालिका प्रशासनाने घेतला आहे. याविरोधात वडगाव शेरी नागरिक मंच व शिरूर तालुका मित्र परिवाराच्या वतीने सोमवारी नगर रोड येथे धरणे आंदोलन करण्यात आले. महापालिकेने दर गुरुवारी पाणी कपात करण्याचा निर्णय घेतल्याने परिसरातील नागरिक त्रस्त आहेत. त्यातच आता खराडी, चंदननगर परिसरात दिवसाआड पाणी पुरवठ्याचा करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे.
केवळ याच भागासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे आंदोलकांनी या निर्णयाला आक्षेप घेतला असून, तीव्र भावना व्यक्त केल्या. वडगाव शेरी नागरिक मंचाचे आशिष माने, तसेच शिरूर तालुका मित्र परिवाराचे बाळा पर्हाड यांनी या आंदोलनासाठी पुढाकार घेतला.
संतोष भरणे, संकेत गलांडे, नीलम अय्यर, राहुल दळवी, सयाजी कोलते, सदाशिव गायकवाड, किरण खैरे, सुमित खेडकर, रमेश सिंग, फिरोज मणीयार, दीपक कोठावळे, प्रशांत कदम, हरिश पुजारी, रमेश सिंग, राकेश खेडकर, तुषार कामथे, दयानंद कांबळे, अमोल केदारी, तेजश्री पर्हाड यांच्यासह परिसरातील महिला या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. दोन दिवसांत हा निर्णय बदलला नाही, तर नगर रोडवर रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा या वेळी आंदोलकांनी महापालिकेला दिला आहे.
पालखी सोहळ्यासाठी टँकरने पाणीपुरवठा करण्याच्या नियोजनात वरिष्ठ अधिकारी व्यस्त आहेत. यामुळे दिवसाआड पाणी पुरवठ्याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल.
-नितीन जाधव, कनिष्ठ अभियंता, महापालिका