आयुष्यातील छोट्या छोट्या गोष्टींचा आनंद घेतला तर जीवन सुंदर होते.:- व्याख्याते गणेश शिंदे  — आळंदीत स्व.कांतीलाल चोरडिया यांच्या कांती पर्व आत्मचरित्राचे प्रकाशन…

दिनेश कुऱ्हाडे

उपसंपादक

आळंदी : जीवन सुंदर व्हावे यासाठी निश्चित असा कोणताही फॉर्म्युला नाही; परंतु आयुष्यातील छोट्या छोट्या गोष्टींचा आनंद घेतला तर जीवन सुंदर होते!” असे प्रतिपादन सुप्रसिद्ध व्याख्याते गणेश शिंदे यांनी आळंदी येथील श्री.ज्ञानेश्वर विद्यालयात केले. स्व.कांतीलालजी चोरडिया यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त आयोजित व्याख्यानमालेत ‘जीवन सुंदर आहे!’ या विषयावरील पुष्प गुंफताना शिंदे बोलत होते.यावेळी स्व.कांतीलालजी चोरडिया यांच्या जीवनावर आधारित कांती पर्व या आत्मचरित्राचे प्रकाशन सोहळा संपन्न झाला, कांती पर्व जीवनचरित्राचे प्रकाशन सोहळा श्रीमती आनंदीबाई चोरडिया यांच्या हस्ते करण्यात आले. 

      यावेळी प्रसिद्ध व्याख्याते गणेश शिंदे, ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सुरेश वडगावकर, डॉ.मनोज राका, उपायुक्त ज्ञानेश्वर मोळक, सचिव अजित वडगावकर, माजी नगरसेवक संतोष चोरडिया, मदनशेठ बोरुंदीया, आनंदराव मुंगसे, डॉ.आर.एम.शेटीया, मोहनलाल चोपडा, ज्ञानेश्वर चौधरी, अतुल लोढा, राजेश चोरडिया, परेश चोरडिया आदी मान्यवर उपस्थित होते.

     व्याख्याते शिंदे पुढे म्हणाले की, “आत्म्याशी जे संबंधित आहे त्याला सुख म्हणावे, असे ज्ञानेश्वर माउली म्हणतात; परंतु आपण भौतिक साधनांमध्ये सुख शोधतो. सौंदर्यप्रसाधने, खूप मार्क्स, मोठा पगार, मोठा बंगला म्हणजे सुंदर जगणे नाही. आताची पिढी खूप बुद्धिमान आहे; परंतु दुसऱ्याचे ऐकण्यात तिला स्वारस्य नाही. वय वर्षे एक ते अकरा या गटातील मुलांचे डोळे मोबाईलमुळे व्याधीग्रस्त झाले आहेत. आईच्या स्पर्शापेक्षा लहान मूल मोबाईलच्या सान्निध्यात शांत राहते, हा मातृत्वाचा पराजय आहे. आपला ध्येयापर्यंतचा प्रवास जीवनातील लहानसहान गोष्टींचा आनंद घेत पूर्ण झाला पाहिजे. आपला आनंद हा इतरांच्या प्रतिक्रियेवर अवलंबून असतो. निसर्ग हा आपण देतो त्याच्या कित्येक पटीने आपल्याला परत देत असतो. त्यामुळे ज्या दिवशी आपल्याला मदत करणाऱ्यांच्या यादीपेक्षा आपण मदत केलेल्यांची यादी मोठी होईल तेव्हाच आपले जीवन सुंदर होईल! पैसा जरूर कमवा; पण तो सत्कार्यासाठी खर्च करायला शिका. आपल्या आवडीनिवडीचा शोध घ्या. आयुष्यातील छोट्या गोष्टींचा आनंद घ्या म्हणजे जगणे सुंदर होईल!” काव्यपंक्ती उद्धृत करीत, दैनंदिन जीवनातील प्रसंग आपल्या नर्मविनोदी शैलीतून कथन करीत शिंदे यांनी श्रोत्यांना हसवत अंतर्मुख केले.

      यावेळी स्व.कांतीलालजी चोरडिया यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते या रक्तदान शिबिरात ६२ रक्तदात्यांनी रक्तदान करून आपले कर्तव्य बजावले. या कार्यक्रमाचे आयोजन सतिषकुमार चोरडिया, ज्योती चोरडिया, शैला लोढा आणि चोरडिया परिवाराने केले होते.