दिनेश कुऱ्हाडे
उपसंपादक
पुणे : आळंदी परिसरातून वाहणारी इंद्रायणी नदी हा सर्वांच्या आस्थेचा, प्रथा, परंपरा, श्रद्धेचा विषय असून, नदीमध्ये प्रदूषित सांडपाणी येऊ नये, यासाठी पिंपरी चिंचवड महापालिका, नगरपरिषदा, ग्रामपंचायत हद्दीतील गावांमधील दैनंदिन वापराचे ६० ते ६५ एमएलडी पाणी कुठलीही प्रक्रिया न करता दूषित पाणी थेट इंद्रायणी नदीत सोडले जात आहे. तसेच या परिसरातील औद्योगिक वसाहती आणि काही लघु, माध्यम कारखाने नदीत थेट सांडपाणी सोडत असल्याचे निदर्शनास येत आहे. आषाढी वारी पालखी सोहळा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. ऐन वारीच्या तोंडावर आळंदीत येणाऱ्या वारकऱ्यांच्या, भाविकांच्या जीवाशी खेळ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे संबंधित कंपन्या सहकारी सोसायट्या, स्थानिक स्वराज्य संस्थांचे बेजवाबदार अधिकारी, औद्योगिक वसाहतींवर गुन्हे दाखल करण्याची मागणी शिवसेनेच्या वतीने करण्यात आली आहे. लवकरात लवकर यावर कारवाई न झाल्यास शिवसेना स्टाईलने आंदोलन केले जाणार असल्याचे निवेदन महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळच्या पुणे विभाग प्रादेशिक अधिकारी यांना देण्यात आले. यावेळी शहर प्रमुख संजय मोरे, प्रसिद्धी प्रमुख अनंत घरत, युवा सेनेचे युवराज पारीख, विभागप्रमुख राजेश मोरे, शिवाजीनगर विभाग संघटक अतुल दिघे, शाखाप्रमुख राजेश शेलार, राजा गांजेकर, अभिषेक जगताप उपस्थित होते.
अनंत घरत म्हणाले की, इंद्रायणीतील केमिकलसह सांडपाणी मिश्रीत पाणी वारकऱ्यांना तीर्थ म्हणून प्यावं लागत आहे हे आमच्यासाठी धार्मिक भावना दुखावल्या इतकेच धक्कादायक आहे. आषाढी वारीच्यावेळी राज्यभरातील चार ते पाच दिवस लाखो भाविकांना याच पाण्यात आंघोळ करावी लागते. शिवाय काही ठराविक वेळेला संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या समाधीला मुखवट्याला देखील इंद्रायणीच्या पाण्याने अभिषेक केला जातो. प्रदूषित पाण्यामुळे भाविकांच्या भावना दुखावल्या जात आहेत. भाविकांच्या आरोग्याशी खेळ होत आहे. प्रशासनाकडून देखील याकडे लक्ष दिलं जात नसल्याचं पाहायला मिळतं. त्यामुळे अलंकापुरी जणू इंद्रायणीला काळ्या पाण्याची शिक्षा मिळाली आहे. त्यामुळे वेळेप्रसंगी अधिकाऱ्यांना त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून देण्यासाठी तुकाराम महाराजांच्या अभंगाच्या उक्तीप्रमाणे ‘नाठाळाच्या माथी हाणू काठी’ चा वापर करावा लागेल असे घरत म्हणाले.