आळंदीत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी.

दिनेश कुऱ्हाडे

उपसंपादक

आळंदी : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी आपल्या राज्यकारभाराने प्रजाहितदक्षतेचा आदर्श घालून दिला आहे. त्यांनी स्त्रीशिक्षण, हुंडाबंदी, पर्यावरण रक्षण असे सुधारणावादी तसेच ग्रामविकास आणि पायाभूत सुविधांच्या विकासाच्या योजना, प्रकल्प जाणीवपूर्वक राबविले.नदीचे घाट, वाटसरूंसाठीच्या धर्मशाळा, मंदिरांची उभारणी-त्यांचा जिर्णोद्धार अशा अनेक गोष्टी आजही त्यांच्या कार्यकर्तृत्वाची साक्ष देत उभ्या आहेत.शौर्य, धैर्य, आणि न्यायाच्या मूर्तीमंत रूप अशा अहिल्यादेवींच्या कार्याला कोटी कोटी प्रणाम करण्यासाठी तसेच जयंतीनिमित्त तिर्थक्षेत्र आळंदीतील पद्मावती रोडवरील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या अर्धपुतळ्याला अभिवादन करण्यात आले.

       यावेळी आळंदी नगरपरीषदेचे मुख्याधिकारी कैलास केंद्रे, भागवत काटकर, विष्णू कुऱ्हाडे, गणेश गरुड, अर्जुन मेदनकर, महादेव पाखरे, अजय तापकीर, राजेश दिवटे, संगीता फफाळ तसेच विविध पक्षांचे, संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.

       पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती निमित्त संपूर्ण आळंदी शहरात भव्य बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी शेकडो तरुणांनी या रॅलीत सहभाग दर्शविला होता. तसेच महाराष्ट्रातील प्रेरणादायी व्याख्याते हभप सचिन महाराज शिंदे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. तसेच अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त ४ जून रोजी भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात येणार आहे. या सर्व कार्यक्रमाचे आयोजन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती उत्सव समितीच्या माध्यमातून करण्यात आले होते.