दिनेश कुऱ्हाडे
उपसंपादक
पुणे : शासकीय पुनर्नियुक्त माजी सैनिक संघटना महाराष्ट्र राज्य (शासन मान्यता प्राप्त), संघटनेचे राज्यस्तरीय अधिवेशन पुणे येथे संपन्न झाले.
शासकीय पुनर्नियुक्त माजी सैनिक संघटनेचे राज्यस्तरीय अधिवेशन वर्ष २०२३ दि.२७ व दि.२८ मे रोजी सैनिक लॉन्स, पुणे येथे नियोजन करण्यात आलेले होते.
यामध्ये राज्यभरातून संघटनेचे 29 जिल्ह्याचे जिल्हा पदाधिकारी यांनी सहभाग नोंदवला. सैनिक कल्याण विभाग (महाराष्ट्र शासन) उपसंचालक कर्नल (निवृत्त) राजेंद्र जाधव हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी कार्यक्रमाचे उद्घाटन व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. संघटनेचे राज्याध्यक्ष बाजीराव देशमुख यांनी वर्षभरातील संघटनेच्या कामकाजाचा आढावा घेऊन जिल्ह्यांचे पदाधिकारी यांना मार्गदर्शन केले व यापुढेही संघटना शासकीय पुनर्नियुक्त माजी सैनिकाच्या प्रलंबित मागण्याबाबत निरंतर झटत राहू,असे सांगितले. राज्य कोषाध्यक्ष विवेक पांडे यांनी संघटनेचा वर्षभराचा लेखाजोखा सादर केला.
मागील दहा वर्षात संघटनेच्या माध्यमातून शासकीय सेवेतील माजी सैनिकांची वेतन निश्चिती, बदली धोरणामध्ये प्राधान्य क्रमाचा शासन निर्णय, मालमत्ता करात सूट, टंकलेखन परीक्षेतील शिथिलता,पाल्यांना व्यावसायिक शिक्षणामध्ये पाच टक्के अटीमध्ये शिथिलता, शिष्यवृत्ती योजनेमध्ये सवलत व शारीरिक शिक्षण शिक्षकांच्या भरती प्रक्रियेचा शासन निर्णय निर्गमित अशा अनेक माजी सैनिकांच्या जिव्हाळ्याचा मुद्दय़ांवर यश संपादन केले. यापुढे संघटनेच्या माध्यमातून वीर नारीची अनुकंपा तत्वावरील नियुक्ती, जुनी पेन्शन, सेवा जेष्ठता, कृषी सेवक वेतन निश्चिती व वर्ग एक आणि दोन पदासाठी आरक्षण इत्यादी मुद्द्यावर संघटना संघर्ष करत राहील.
संघटनेतील रिक्त असलेल्या पदासाठी निवडणूक पार पडली. सदर निवडणुकीमध्ये बाळासाहेब जाधव यांची संघटनेच्या सरचिटणीस पदी, संजय मेटिल यांची चिटणीस पदी, बिपिन मोघे यांची नागपूर विभागीय उपाध्यक्षपदी व किशोर पाटील यांची नाशिक विभागीय उपाध्यक्षपदी निवड झाली.
या अधिवेशनात संघटनेचा वार्षिक अंक कर्मयोध्येचे विमोचन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. तसेच संघटनेच्या पुढील वाटचाली बाबत दिशा ठरविण्यात आली आणि विशेष कार्याबद्दल पदाधिकाऱ्यांना पुरस्कृत केले असे कार्यक्रम नियोजन समितीचे अध्यक्ष व पुणे विभागीय उपाध्यक्ष प्रकाश भिलारे यांनी पत्रकाद्वारे सांगितले.या कार्यक्रमाचे नियोजन संघटनेच्या पुणे जिल्ह्याने केले.