दिनेश कुऱ्हाडे
उपसंपादक
पुणे विभाग : श्रीक्षेत्र कौंडण्यपूर येथून श्रीक्षेत्र पंढरपुरकडे आषाढी एकादशी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी जाणार्या माता रुख्मिणीच्या पालखीचे अंबानगरीतल्या बियाणी चौकात आमदार यशोमती ठाकूर यांच्याहस्ते शुक्रवारी सांयकाळी जंगी स्वागत करण्यात आले.
विशेष म्हणजे या मंगलमय सोहळ्याकरिता सर्वच धर्मातील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित असल्याने हा सोहळा सर्वधर्म समभावाचा संदेश देणारा ठरला.
श्रीक्षेत्र कौंडण्यपूर येथील रुख्मिणी मातेची पालखी श्रीक्षेत्र पंढरपुर येथे होणार्या आषाढी सोहळ्याकरिता जाण्याची अनेक वर्षाची परंपरा आहे. श्रीक्षेत्र पंढरपुरच्या धर्तीवरच रुख्मिणी मातेचेही शासकीय पुजन व्हावे व श्रीक्षेत्र पंढरपुर येथे संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी प्रमाणेच रुख्मिणी मातेच्या पालखीलाही मानाचे स्थान मिळावे यासाठी आमदार यशोमती यांनी भगिरथ प्रयत्न केले आणि ते यशस्वी झाले. पालखी श्रीक्षेत्र कौंडण्यपूर येथून निघाल्यानंतर शुक्रवारी सांयकाळी अमरावती शहरातल्या बियाणी चौकात आगमन होताच पालखीचे व सहभागी वारकर्यांचे उत्स्फूर्त अन् जंगी स्वागत करण्यात आले. भक्तीत तल्लीन झालेल्या वारकर्यांसोबत आ. यशोमती यांनी फुगडीचा फेर धरला. त्यांनी काही अंतरापर्यंत पालखी खांद्यावर घेतली अन् त्यानंतर वारकर्यांचा पुढचा प्रवास सुरु झाला.
तिवसा, मोर्शी, भातकुली तालुक्यातील असंख्य भाविक तसेच शहरातील असंख्य भक्तांची यावेळी उपस्थिती होती. यावेळी आ.बळवंत वानखडे, आ.सुलभा खोडके, विरेंद्र जगताप, विभागीय आयुक्त निधी पांडेय, जिल्हाधिकारी पवनीत कौर, पोलिस आयुक्त नविनचंद्र रेड्डी, पोलिस अधिक्षक अविनाश बारगळ, प्रभारी जिल्हाधिकारी भाकरे, मुख्य कार्यकारी अधिकारी अविशांत पंडा, पुष्पमाला ठाकूर, आकांक्षा ठाकूर, कृउबास सभापती हरिष मोरे, उपसभापती भैय्यासाहेब निर्मळ यांच्यासह अन्य संख्येने सहभागी झाले होते.