चुकीचे लिहिणे त्याचप्रमाणे काही न लिहिणे हेदेखील तिककेच गंभीर आहे :- ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर 

दिनेश कुऱ्हाडे 

  उपसंपादक 

पुणे : वाचकांना काय द्यायचे यापेक्षाही काय द्यायचे नाही, या फेऱ्यात जगातील पत्रकारिता अडकली आहे. पत्रकारितेला मानवी चेहऱ्याचा विसर पडला असून एखाद्या गोष्टीमुळे मानवी व्यवहारात काय फरक पडला यादृष्टीने वार्तांकन होत नाही, चुकीचे लिहिणे त्याचप्रमाणे काही न लिहिणे हेदेखील तिककेच गंभीर आहे अशी खंत ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांनी व्यक्त केली.

       ग्रंथाली, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा संज्ञापन व वृत्तपत्रविद्या विभाग आणि पुणे श्रमिक पत्रकार संघ यांच्या वतीने ज्येष्ठ पत्रकार आणि विभागाचे माजी प्रमुख अरुण साधू लिखित तसेच ज्येष्ठ पत्रकार डॉ.किरण ठाकूर संपादित ‘कोड ऑफ जर्नालिस्टिक एथिक्स’ या पुस्तकाच्या प्रकाशन कार्यक्रमात केतकर बोलत होते. ज्येष्ठ पत्रकार राजीव साबडे आणि सुरेश भटेवरा, वृत्तविद्या विभागाचे प्रमुख डॉ. संजय तांबट, ग्रंथालीचे सुदेश हिंगलासपूरकर आणि पत्रकार संघाचे अध्यक्ष सुनीत भावे या वेळी उपस्थित होते.

         केतकर म्हणाले, ‘मणिपूरमध्ये दोन समूह एकमेकांविरोधात लढत असताना तिथे पंतप्रधानच काय पत्रकारही जात नाहीत. मानवत हत्याकांडाचे वार्तांकन कसे करायचे हा प्रश्न अरुण साधू यांना तेव्हा पडला होता. ते राजकारणाच्या किंवा राजकारण्यांच्या विरोधात नव्हते, तर व्यवस्थेविरोधात होते. नळाद्वारे आलेले पाणी ही बातमी नाही. तर, ते पाहून महिलेच्या डोळ्यात आलेले पाणी ही ‘स्टोरी’ आहे, अशी साधू यांची धारणा होती.’