उपराजधानीतील दगडफेकीची घटना चिंताजनक :- डॉ.हुलगेश चलवादी… –चिथावणीखोर वक्तव्य करणाऱ्यावर कारवाई करा…

दिक्षा ललिता देवानंद कऱ्हाडे 

             वृत्त संपादिका 

दिनांक १८ मार्च २०२५, पुणे :- 

         पुरोगामी महाराष्ट्राच्या उपराजधानीत घडलेली हिंसाचाराची घटना चिंताजनक आहे.दोन गट समोरोसमोर आल्याने घडलेली ही घटना महाराष्ट्रातील शांततेचे वातावरण बिघडवणारी आहे.अशात धार्मिक तेढ आणि चिथावरणीखोर वक्तव्य करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी बहुजन समाज पक्षाचे प्रदेश महासचिव आणि पश्चिम महाराष्ट्र झोन मुख्य प्रभारी डॉ.हुलगेश चलवादी यांनी आज, मंगळवारी (ता.१८) केली आहे.

        नागपूर येथील भालदारपुरा येथे निर्माण झालेली परिस्थिती ही राज्याच्या गृहखात्याचे मोठे अपयश आहे.अशाप्रकारच्या घटना नागपूर सारख्या शांतताप्रिय शहरासाठी धक्कादायक आहे.हिंसाचार घडवून आणण्याचा पूर्वनियोजित कट होता का? याचा शोध पोलिसांनी घेण्याची गरज आहे. उपराजधानीच्या मध्यवर्ती भागात अशाप्रकारच्या दगडफेकीच्या घटना घडत असतील तर सत्ताधाऱ्यांनी राज्यातील असंतोषाला वेळीच ओळखण्याची आवश्यकता आहे,असे मत डॉ.चलवादी यांनी व्यक्त केले. अशाप्रकारच्या घटना राज्यातील इतर भागांमध्ये घडू नये याची काळजी सरकारने घ्यावी, असे आवाहन डॉ.चलवादी यांनी केले आहे.

          राज्यात गेल्या काळी काळात ठरवून तणाव निर्माण होईल, असे वक्तव्य केले जात आहे. अशा वक्तव्यावर सरकारने वेळीच आळा घालून संबंधितांवर कारवाई करण्याची गरज निर्माण झाली असल्याचे डॉ.चलवादी म्हणाले.पोलिसांवर दगडफेक करणे समर्थनिय नाही.दगडफेकीत अनेक पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत.

          तणाव सदृश्य वातावरण निर्मिती करणाऱ्यांवर कारवाईची आवश्यकता असल्याचे मत डॉ.चलवादी यांनी व्यक्त केले. छत्रपती-फुले-शाहू-आंबेडकर आणि संतांनी घडवलेल्या पुरोगामी महाराष्ट्रात अशाप्रकारच्या घटनांना स्थान नाही.महाराष्ट्रात विविध जाती-धर्माचे लोक गुण्यागोविंदाने राहतात. अशात या घटनेला जबाबदार असणाऱ्या मुख्य ‘मास्टर माईंड’ला अटक करण्याची मागणी डॉ.चलवादी यांनी यानिमित्ताने केली आहे.