लढाई : विषमते विरूध्द समतेची…

         विषमता आणि समता हे परस्पर विरोधी विचार , संकल्पना आणि व्यवस्था आहेत.त्यास आपण विषमतावादी समतावादी व्यवस्था ,विचार किंवा संकल्पना असे म्हणतो.परस्पर विरोधी म्हणूनच या दोन व्यवस्थेची विचाराची लढाई ही कायमच चालत असते.ही आजची लढाई नाही,तर प्राचीन काळापासून चालत आलेली लढाई आहे,

     या लढाईचे तीन प्रकार आहेत.

1 आर्थिक लढाई

2 सामाजिक लढाई

3 सांस्कृतिक लढाई

         या प्रत्येक लढाईचे विचार,सिद्धांत,विचारवंत,कार्यकर्ते, महात्मे,महामानव असतात,होऊन गेलेले पण असतात.

        विषमता विरुद्ध समता ही लढाई नैसर्गिक नसून मानवी लढाई आहे.याचा अर्थ दोन व्यक्ती,दोन समूह,दोन आर्थिक समाजिक राजकीय व्यवस्थेची ही लढाई आहे.जी परस्पर विरोधी आहे.आर्थिक समतेची लढाई ही समाजातील म्हणजे मानव जातीतील गरीब मध्यम श्रीमंत हे तीन वर्ग नष्ट करून सर्वांना समान जीवनमान चे पातळीवर आणणे,आर्थिक भेदभाव मिटविणे हे धेय्य आर्थिक समतेच्या लढाईचे आहे.

         तर सर्व मानवास समान संधी,समान दर्जा मिळावा,माणसातील भेदभाव मिटावा,वरिष्ठ कनिष्ठ,उच्च नीच्च हा भेदभाव नसावा,सारी माणसे म्हणजे तुकाराम महाराजांच्या भाषेत ” एका देहाची ही अवयव ” या समतेच्या भाव विश्वात सर्वांनी नांदावें.हा सामाजिक समतेच्या लढाईचा मुख्य उद्देश आहे.

            आणि तिसरी समतेची लढाई ही स्वातंत्र्याची लढाई आहे,तिचा उद्देश सर्वांना म्हणजे प्रत्येकाला त्याच्या विचाराप्रमाने अभिव्यक्त होण्याचे स्वातंत्र्य हवे,याचा अर्थ ” मी काय आणि कोणता विचार करावा ? मी कसे असावे ? मी काय खावे ? काय ल्यावे ? थोडक्यात केशभूषा वेशभूषा माझी काय असावी ? हे ठरविण्याचा अधिकार धर्माचा नसून माझा वैयक्तिक स्वतःचा आहे.मात्र माझ्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा दुष्परिणाम इतरांवर होणार नाही,याची काळजी पण मी घेतली पाहिजे”.

         असा विचार,असा सिद्धांत,अशी व्यवस्था,असा व्यवहार म्हणजे समतेसाठी केलेली लढाई होय.आणि यास प्रतिबंध किंवा विरोध म्हणजेच विषमतेची लढाई होय.याचा अर्थ विविध सामाजिक रूढी,परंपरा,आस्था,आराधना ,व्यवहार,ही विविधता यास मान्यता,यांचे आचरण करण्याचे स्वातंत्र्य,सर्व परंपरांचा आदर करण्याचे कर्तव्य,परंतु ज्या रूढी परंपरात हिंसा,शारीरिक शोषण आणि आर्थिक पिळवणूक आहे,अंधश्रध्दा आहे अशा परंपरांना विरोध करण्याचे स्वातंत्र्य म्हणजे विषमता विरुद्ध समतेची सांस्कृतिक धार्मिक लढाई होय.

            विषमतेच्या मुळाशी स्वार्थ,शोषण,वर्चस्व,श्रेष्ठत्व, वंशत्व, भेदभाव ही मूळ तत्वे किंवा विचार आहेत.आणि स्वातंत्र्य समता बंधुभाव न्याय समाजवाद लोकशाही धर्मनिरपेक्षता, विविधतेत एकता,प्रेम,आदर,दया ,क्षमा,शांती इत्यादी विचार ,तत्वे सिद्धांत,संकल्पना समतेच्या लढाईची प्रेरणा आहेत.

          अर्थात जगातील विचारवंत एकत्र येऊन आणि जागतिक संघटना “युनो” या जागतिक संसदेत चर्चा होऊन स्वीकारलेली आणि बहुमतांनी मान्य केलेली ” स्वातंत्र्य समता बंधुभाव न्याय ” ही चार मूल्य,ही मानवी मूल्य असून अखिल मानव जातीचा उध्दार करणारी मूल्य आहेत,अशी स्वीकृती सहमती जगाने मान्य केले आहे.याचा अर्थ समता सर्वानाच हवी आहे,पण काही मूठभर स्वार्थी,ऐतखाऊ,दुष्ट प्रवृत्तीचे लोक की ज्यांना विषमतेचे विचार तत्व सिद्धांत व्यवस्था हवी आहे.ते विषमतावादी समतावादी सोबत झगडत असतात.

             अर्थात विषमता विरुद्ध समतेची व्यवस्था आणण्यासाठी इतिहासात अनेक लढाया झाल्या,ज्यात कार्ल मार्क्स,गौतम बुध्द,जैन,चक्रधर,सॉक्रेटिस, प्लेटो, गॅलिलिओ,आइंस्टेन,वॉशिंग्टन,नेल्सन मंडेला,फुले शाहु आंबेडकर असे कितीतरी विचारवंत आहेत,की ज्यांनी समतेची लढाई केली.

          यांचा वारसा टिकविणे,चालविणे याची जबाबदारी ही ज्या गरीब मध्यम वर्गाचे शोषण होते,त्यांनी,आणि ज्या श्रीमंतांना विषमता म्हणजे अन्याय,अत्याचार,पिळवणूक,काळाबाजार,महागाई,देहविक्री ची व्यवस्था वाटते अशा श्रीमंतांनी पण लोकशाही स्वातंत्र्य सर्वधर्म समभाव,बंधुभाव ,विविधतेत एकता या मुल्या साठी या ” विषमता विरुद्ध समता ” या लढाईत समतेच्या बाजूने ठामपणे उभे राहिले पाहिजे,तरच विश्वशांती प्रस्थापित होईल,मगच जीवनाचा खरा आनंद मिळेल.

   लेखक : दत्ताभाऊ तुमवाड

         सत्यशोधक समाज नांदेड

              दिनांक : १५ मार्च 2025

                    फोन : 9420912209