
दिनेश कुऱ्हाडे
उपसंपादक
पुणे : डॉ.पी.व्ही कुलकर्णी यांनी अहमदाबाद येथील फिजिकल रिसर्च लॅबोरेटरी येथे भारतातील पहिल्या अवरक्त किरण खगोलशास्त्र या क्षेत्रात मोठे योगदान दिले आहे. माऊंटअबूवरील गुरूशिखरावर वेधशाळा बांधून टेलिस्कोपचीही निर्मिती केली आहे.
डॉ.कुलकर्णी आपल्या कामाप्रति शिस्तप्रिय आणि जिद्दी शास्त्रज्ञ म्हणून प्रसिद्ध होते. त्यांच्या ’ॲरो ऑफ (माय) टाईम’ या इंग्रजी आत्मचरित्राचा डॉ.संगीता गोडबोले यांनी केलेला भावानुवाद मनाची पकड घेणारा असून डॉ.कुलकर्णी यांचे व्यक्तिचित्रण आणि कार्य या पुस्तकातून आपल्या समोर येते, असे प्रतिपादन अहमदाबाद येथील स्पेस ॲप्लिकेशन सेंटर आणि तिरुवनंतपूरम येथील विक्रम साराभाई स्पेस सेंटरचे माजी संचालक पद्मश्री डॉ. प्रमोद काळे यांनी केले.
खगोल भौतिक शास्रज्ञ डॉ.पी.व्ही. कुलकर्णी लिखित ’ॲरो ऑफ (माय) टाईम’ या मूळ इंग्रजी आत्मचरित्राचा ’माझ्या काल-शराचा प्रवास’ या डॉ. संगीता गोडबोले यांनी भावानुवाद केलेल्या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ आयोजित करण्यात आला होता. पुस्तकाचे प्रकाशन पद्मश्री डॉ. काळे यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. यावेळी ललिता कुलकर्णी, निवृत्त वैज्ञानिक डॉ.एन.एम.अशोक, आयुकातील डॉ.रंजन गुप्ता, ग्रंथालीचे सुदेश हिंगलासपूकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
माऊंटअबू येथील टेलिस्कोपच्या बांधणीच्या काळात डॉ.पी.व्ही. कुलकर्णी यांच्याशी अनेकदा संवाद घडल्याचे डॉ. प्रमोद काळे यांनी सांगितले.
डॉ.संगीता गोडबोले पुस्तकाविषयी बोलताना म्हणाल्या, डॉ.पी.व्ही. कुलकर्णी यांचे इंग्रजीतील आत्मचरित्राचे हस्तलिखित माझ्या वाचनात आल्यानंतर एखाद्या व्यक्तीचा जीवनप्रवास कशापद्धतीने मार्गदर्शक ठरू शकतो याची जाणीव झाली. डॉ.कुलकर्णी यांच्यातील संशोधकवृत्ती, ध्येय साध्य करण्यासाठी घेतलेले कष्ट, अथक परिश्रम आणि ध्यास हे माझ्या मनाला भिडले.
यातून पुढील पिढीला संशोधन क्षेत्रात येण्याची जिद्द निर्माण व्हावी या विचाराने या पुस्तकाचा मराठी भाषेत भावानुवाद केला आहे. या पुस्तकाच्या निर्मितीत अनेक दिग्गज शास्त्रज्ञ-संशोधकांची मोलाची मदत झाली आहे. सूत्रसंचालन डॉ.संयुक्ता कुलकर्णी यांनी केले तर आभार मधुवंती कुलकर्णी यांनी मानले.