
दिनेश कुऱ्हाडे
उपसंपादक
पुणे : पुणे शहरातील कसबापेठ विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेस पक्षाचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. याप्रसंगी शिंदे यांनी त्यांचे पक्षात स्वागत करून आता जगाला ‘हू ईज धंगेकर’.. हे कळल्याशिवाय राहणार नाही अशा शुभेच्छा दिल्या.
रवींद्र धंगेकर यांनी पुन्हा एकदा धनुष्यबाण उचलला आणि भगवा हाती घेतला. रवींद्र धंगेकर हे पुण्यातले लोकप्रिय नेते म्हणून सुपरिचित आहेत. त्यांनी आपल्या कामातून आपली स्वतंत्र अशी ओळख निर्माण केली. २५ वर्ष ते नगरसेवक होते, त्यापैकी १० वर्ष ते शिवसेनेचे नगरसेवक होते. शिवसेनेत आल्याने पुन्हा एकदा त्यांना स्वगृही आल्याचे समाधान मिळेल. तसेच त्यांच्या कामाची पद्धत आणि दांडगा जनसंपर्क पाहता लवकरच पुण्यातून हजारो कार्यकर्ते शिवसेनेत येतील असा विश्वास उपमुख्यमंत्री शिंदे यासमयी व्यक्त केला. काम करणाऱ्या माणसाच्या पाठीशी मी ठामपणे उभा राहतो त्यामुळे तुमच्या पाठीशी मी नक्कीच उभा राहीन असा विश्वास याप्रसंगी व्यक्त केला.
याप्रसंगी शिवसेना नेते व माजी खासदार आनंदराव अडसूळ, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे, उद्योगमंत्री उदय सामंत, आमदार शरद सोनावणे, आमदार प्रकाश सुर्वे, आमदार मुरजी पटेल, माजी आमदार राजन साळवी, जिल्हाप्रमुख अजय भोसले, जिल्हाप्रमुख रमेश कोंडे, शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे, युवासेनेचे किरण साळी तसेच शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते.