
शेखर इसापूरे
उपसंपादक
दखल न्यूज भारत
भंडारा/गोंदिया:- महाराष्ट्र सरकारच्या १० मार्च २०२५ रोजी सादर केलेल्या अर्थसंकल्पावर काँग्रेसचे भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ.प्रशांत पडोळे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. हा अर्थसंकल्प म्हणजे केवळ नवीन घोषणांचा बाजार असून, प्रत्यक्षात सामान्य जनतेच्या हाती काहीच लागणार नाही. निवडणुकीपूर्वी दिलेली आश्वासने महायुतीतील सर्व पक्ष विसरले आहेत. जनता आता या महायुती सरकारला धडा शिकवेल, अशी प्रतिक्रिया खासदार डॉ.प्रशांत पडोळे यांनी दिली.
सध्या संसदेच्या अधिवेशनासाठी नवी दिल्ली येथे आहेत. त्यांनी सांगितले की, विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुती सरकारने महिलांना दरमहा २१०० रुपये देण्याचे आश्वासन दिले होते. निवडणूक प्रचारासाठी भंडारा जिल्ह्यात आलेले तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तर प्रचारादरम्यान दीड हजार, दोन हजार, अडीच हजार, तीन हजार अशा टप्प्यामध्ये अनुदान वाढवण्याची घोषणा करून टाळ्या घेतल्या होत्या. मात्र, या अर्थसंकल्पात वाढीव रकमेचा उल्लेखही नाही. पुढील काळात हे सरकार हे अनुदानच बंद करेल, तर आश्चर्य वाटू नये.
शेतकऱ्यांसाठीही सरकारने कोणताही ठोस विचार केलेला नाही. नैसर्गिक आपत्ती, कर्जबाजारीपणा आणि उत्पादन खर्चाच्या वाढीमुळे शेतकरी अडचणीत आहेत, मात्र त्यांना सरकारने पुन्हा वाऱ्यावर सोडले आहे. शेतकरी सन्मान निधी किंवा कर्जमाफी याचा सरकारच्या भाषणातही उल्लेख नाही. महिला सुरक्षित नाहीत.
रोजगार आणि उद्योग क्षेत्रातही कोणतीही ठोस तरतूद नाही. सरकारने नवीन संधी निर्माण करण्याच्या गप्पा मारल्या, पण प्रत्यक्षात काहीच केले नाही. फक्त घोषणाबाजी, भाषणबाजी आणि आकड्यांचा खेळ सुरू आहे, पण सामान्य माणसाला त्याचा काहीही उपयोग नाही.
डॉ.प्रशांत पडोळे म्हणाले की, सरकारने जनतेची सरळसरळ फसवणूक केली आहे. महायुतीने फसवणूक केली आहे, याची जाणीव आता राज्यातील जनतेला झाली आहे. दिलेल्या आश्वासनांची पूर्तता झालेली नाही. हा अर्थसंकल्प दिशाहीन असून महाराष्ट्राच्या जनतेची थट्टा करणारा आहे.
जर सरकार अशाच पद्धतीने दिशाभूल करत राहिले, तर महाराष्ट्राच्या विकासाला मोठा फटका बसणार आहे. राज्यातील जनतेच्या अडचणी दिवसेंदिवस वाढतच जाणार आहेत. अशी प्रतिक्रिया भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ.प्रशांत पडोळे यांनी दिली.