चिमूर तालुकातंर्गत अवैध वृक्षतोड आणि अवैध वाळू-मुरुम उत्खननाकडे अधिकाऱ्यांची पाठ… — लोकप्रतिनिधींचेही दुर्लक्ष?..

   उपक्षम रामटेके 

मुख्य कार्यकारी संपादक 

       चिमूर विधानसभा मतदारसंघातील अवैध वृक्षतोड आणि वाळू,मुरुम उत्खननाच्या वाढत्या घटनांमुळे अपघात घटनांमध्ये वाढ झाली आहे आणि परिसरातील पर्यावरण व स्थानिक जनतेच्या जीवनमानावर गंभीर परिणाम होत आहेत. 

         वृक्षतोड आणि अवैध वाळू-मुरुम उत्खननाकडे स्थानिक प्रशासन आणि लोकप्रतिनिधींचे होणारे दुर्लक्ष नागरिकांत चर्चेचा विषय बनली आहे.

।            वाळू उत्खनन….

      चिमूर तालुक्यातील उमा नदीसारख्या प्रमुख नद्यांमधून अवैध वाळू उत्खनन मोठ्या प्रमाणावर सुरू आहे.विशेषत चिमूर शहरातील चावळी परिसर,शेडेगाव,सोनेगाव,सरडपार,उसेगाव,नंदारा,मासळ,वडशी,मानेमोहाळी,गोरवट,मेटेपार,पिंपळगाव,गदगाव,उरकुडपार, गरडापार,महालगाव काळू, नवेगाव पेठ, या भागांमध्ये हे उत्खनन चालू आहे.अवैध उत्खननामुळे शासनाच्या महसुलाचे मोठे नुकसान होत आहे. 

अवैध वृक्षतोड….

        चिमूर तालुकातंर्गत भिसी वन उपक्षेत्रातील परिसरात नदी-नाल्यांच्या थडव्यावरील आणि इतर ठिकाणी नियमबाह्य अवैध वृक्षतोड झाल्याचे उघडकीस आले आहे.

          अवैध वृक्षतोड प्रकरणाकडे भिसी विभागाचे वनपाल संतोष औतकार जाणिवपूर्वक दुर्लक्ष करतात काय? या अनुषंगाने त्यांची सखोल चौकशी झालीच पाहिजे या मताची जनता आहे.

        तद्वतच स्वतःची कर्तव्यहिनता झाकण्यासाठी पत्रकारांवर इज्जत दावा ठोकण्याची भाषा वनपाल औतकार करीत असल्याचे एका भ्रमणध्वनी वार्तालाप वरुन समोर आले आहे.त्यांनी खुशाल इज्जत दावा ठोकावा असे संबंधित पत्रकारांचे विनम्रपणे म्हणणे आहे.

        वनपाल संतोष औतकार यांच्या कर्तव्य हिनतेचे पुरावे कोर्टात सादर करायला पत्रकारही तयार आहेत.

       या समस्यांबाबत स्थानिक प्रशासन आणि लोकप्रतिनिधींकडून अपेक्षित ती कारवाई होत नसल्याची भावना नागरिकांमध्ये आहे. विशेषतः महसूल आणि वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी या अवैध वृक्षतोड आणि अवैध वाळू-मुरुम उत्खननाकडे दुर्लक्ष केल्याचे आरोप आहेत.या परिस्थितीत आमदार किर्तीकुमार भांगडिया यांची भूमिका काय आहे,हा प्रश्न उपस्थित होतो.

          आमदार किर्तीकुमार भांगडिया हे चिमूर विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात.त्यांनी विकास हेच ध्येय असल्याचे निवडणुकीत सांगितले होते.

        मात्र,सध्याच्या परिस्थितीत अवैध वृक्षतोड आणि वाळू, मुरुम उत्खननाच्या मुद्द्यांवर त्यांची भूमिका स्पष्ट नाही.या समस्यांवर त्यांनी कोणती ठोस पावले उचलली आहेत किंवा का उचलली नाहीत,याबाबत माहिती उपलब्ध नाही.

        परिसरातील नागरिकांना अपेक्षा आहे की,त्यांच्या लोकप्रतिनिधींनी आणि प्रशासनाने या समस्यांकडे गांभीर्याने लक्ष द्यावे.अवैध उत्खनन आणि वृक्षतोड रोखण्यासाठी कठोर कारवाई करावी,पर्यावरण संरक्षणासाठी प्रभावी उपाययोजना राबवाव्यात आणि स्थानिक जनतेच्या हिताचे रक्षण करावे. 

         तसेच,या विषयावर आमदार किर्तीकुमार भांगडिया यांनी सार्वजनिकपणे आपली भूमिका स्पष्ट करावी,अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

         चिमूर विधानसभा मतदारसंघातील अवैध वृक्षतोड आणि वाळू,मुरुम उत्खननाच्या समस्यांवर प्रशासन आणि लोकप्रतिनिधींच्या सक्रिय सहभागानेच तोडगा निघू शकतो हे वास्तव आहे.पर्यावरण संरक्षण आणि स्थानिक जनतेच्या हितासाठी आमदार किर्तीकुमार भांगडीया यांनी त्वरित आणि प्रभावी पावले उचलणे आवश्यक आहे.