आरोग्य,शिक्षण,सार्वजनिक सुविधांसाठी निधी देणार :-पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे…

अबोदनगो सुभाष चव्हाण

   अमरावती जिल्हा प्रतिनिधी 

             दखल न्युज भारत

            अमरावती, दि.21: जिल्ह्याच्या विकासासाठी आवश्यक असलेला निधी उपलब्ध करून देण्यात येईल. प्रामुख्याने आरोग्य, शिक्षण, सार्वजनिक सुविधांसह जल संधारणाच्या कामांना प्राधान्याने निधी मंजूर केला जाईल. तसेच सीएसआरमधून निधी उपलब्ध करून देऊ, अशी माहिती पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.

            पालकमंत्री श्री. बावनकुळे यांनी आज जलसंपदा विभाग, जिल्हा परिषदेत जाऊन बैठक घेतली. यावेळी त्यांनी सिंचन, पुनर्वसन, जलसंधारण, आरोग्य, आदींबाबत आढावा घेतला. त्यांच्या समवेत आमदार रवि राणा, प्रताप अडसड, केवलराम काळे, राजेश वानखडे, प्रविण तायडे, उमेश ऊर्फ चंदू यावलकर, प्रविण पोटे, जिल्हाधिकारी सौरभ कटियार आदी उपस्थित होते.

            सिंचन हा शासनाचा प्रथम प्राधान्याचा विषय आहे. प्रामुख्याने गेल्या वीस वर्षांपासूनची सिंचनाची व्यवस्था करण्यात आली आहे, अशी जुनी कामे शोधून त्याची दुरुस्ती आणि देखभाल करण्यात येणार आहे. टप्प्याने ही कामे घेण्यात येणार आहे. यामुळे अल्प निधीमध्ये याठिकाणी पाणी साचणार असल्याने सिंचनाची सोय होणार आहे. त्यामुळे प्रत्येक कामाची माहिती सादर करण्यात यावी. सिंचनाची व्यवस्था करताना दर्जेदार पुनर्वसनाची कामे करण्यात यावी. पुनर्वसित गावातील सर्व नागरिक स्थलांतरित होत नाही तोपर्यंत शासनाची जबाबदारी पूर्ण होत नाही. त्यामुळे पुनर्वसनाची कामे जलदगतीने पूर्ण करावीत, असे निर्देश पालकमंत्री श्री. बावनकुळे यांनी दिले.

            नाला खोलीकरण करून त्यातील माती पांदण रस्त्यासाठी वापरण्यात येणार आहे. तसेच प्रकल्पात गाळ आणि रेती साचली असल्यास आपत्ती व्यवस्थापनाअंतर्गत गाळ काढण्याची मोहीम हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे याबाबतचे प्रस्ताव सादर करण्यात यावे.

         जिल्ह्यातील सर्व सिंचन प्रकल्पांना भेटी देण्यात येणार आहे. यात पूर्ण झालेल्या कामांची पाहणी करण्यात येणार आहे. तसेच पुनर्वसन आवश्यक असलेल्या गावातील नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्यावर उपाययोजना करण्यात येणार आहे. शासनाकडून आवश्यक असलेली मदत यासाठी देण्यात येईल.

          पाणी गळती ही मोठी समस्या असून या बाबीवर लक्ष केंद्रित करावे. येत्या काळात सिंचनाची व्यवस्था सुरळीत करण्यात येणार आहे. यासाठी यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.

            जिल्हा परिषदेत जलसंधारण, आरोग्य, महिला व बालविकास आदींचा आढावा घेतला. सार्वजनिक आरोग्य विभागात डॉक्टर आणि रुग्णवाहिका उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न करण्यात यावे. डॉक्टरांसाठी कमी मुदतीत मुलाखती घेण्याचे नियोजन करावे. आवश्यकता भासल्यास आयुर्वेदिक डॉक्टरांची भरती करण्यात यावी. प्रामुख्याने ‘आपला दवाखाना’ येथे डॉक्टरांची व्यवस्था करावी.

          मेळघाटसारख्या दुर्गम भागात विशेषज्ज्ञ डॉक्टरांची व्यवस्था करण्यात यावी. सर्व शाळा, अंगणवाडीमध्ये वीज पुरवठा करण्यात यावा. याठिकाणी पाणी आणि फिल्टरची व्यवस्था करण्यात यावी. येथे डिजीटल अंगणवाडी आणि शाळा तयार करण्यात येईल. यासाठी सीएसआरमधून निधी उपलब्ध करून देण्यात येईल.

          शासनाच्या शाळेत पटसंख्या वाढविण्यासाठी आवश्यक ती सर्व मदत करण्यात येईल. जिल्हा परिषदेतर्फे राबविण्यात येत असलेल्या विविध शैक्षणिक उपक्रमांची माहिती पालकमंत्री श्री.बावनकुळे यांनी यावेळी जाणून घेतली.