21 फेब्रुवारी रोजी होणार विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण…

दामोधर रामटेके 

कार्यकारी संपादक 

चंद्रपुर 18 फेब्रुवारी – चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे आयोजीत करण्यात आलेल्या विविध स्पर्धांचा बक्षीस वितरण सोहळा शुक्रवार 21 फेब्रुवारी रोजी मनपा वाहनतळ परिसरात घेण्यात येणार आहे.

         मनपातर्फे सुंदर माझे उद्यान सुंदर माझी ओपन स्पेस, गणेशोत्सव स्पर्धा,राज्यस्तरीय भिंतीचित्र स्पर्धा, टाकाऊपासून टिकाऊ अश्या विविध स्पर्धा मागील वर्षी तसेच्या वर्षी घेण्यात आल्या होत्या.

       स्पर्धेत वैयक्तिक तसेच गट बनवुन मोठ्या प्रमाणात नागरिकांनी सहभाग घेतला होता. काही स्पर्धा होऊन बराच कालावधी लोटला आहे व त्यांचे विजेतेही घोषित झाले होते त्यामुळे विजेते स्पर्धक आतुरतेने बक्षीस समारंभाची वाट पाहत होते.त्यानुसार आता त्यांना बक्षिसे प्रदान केली जाणार आहे.

           माझ्या शहरासाठी माझे योगदान या थीमवर सुंदर माझे उद्यान व सुंदर माझी ओपन स्पेस अश्या 2 स्वतंत्र स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. यात अनेक संघांनी भाग घेऊन मोठ्या प्रमाणात शहर सौंदर्यीकरणाची कामे करण्यात आली होती.त्याचप्रमाणे गणेशोत्सवाच्या पावन पर्वावर पर्यावरण पुरक सार्वजनिक गणेश मंडळ व सौंदर्यीकरण लीग स्पर्धा 2 टप्यात घेण्यात आली होती. यात गणेशोत्सव सजावट/ देखावे स्पर्धा व सौंदर्यीकरण पंधरवाडा घेण्यात आला.

          सजावट/ देखावे स्पर्धेत चौकात पर्यावरण पूरक मूर्ती व सजावट,ध्वनिप्रदूषण रहित वातावरण,सामाजीक संदेश देणारे देखावा तयार करणे,पेंटिंग,वृक्षारोपण,टाकाऊ पासुन टीकाऊ वस्तु बनविणे,किल्ला स्वच्छता करणे,लोकसहभागातुन सौंदर्यीकरण / बेंचेस / ट्री गार्ड / शिल्प / कारंजे उभारणे,दुकानांमध्ये डस्टबिनचा वापर करणे इत्यादींवर गुणांकन करण्यात आले.

          या सर्व स्पर्धांमध्ये मोठ्या प्रमाणात नागरिक सहभागी झाले असल्याने या बक्षीस वितरण समारंभात त्यांचा बक्षिसे देऊन सन्मान करण्यात येणार आहे.त्यामुळे मोठ्या प्रमाणात यात सर्वांनी सहभागी होण्याचे आवाहन चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे.