राहूल सोलापूरकर वर ॲट्रॉसिटी दाखल करा… — बसप महासचिव डॉ.हुलगेश चलवादींची मागणी…

दिक्षा ललिता देवानंद कऱ्हाडे 

             वृत्त संपादिका 

पुणे :-

            समाजामध्ये वैचारिक संभ्रम निर्माण करीत ‘छुपा एजेंडा’ राबवण्याचे कार्य तथाकथित अभिनेता राहूल सोलापूरकर करीत आहे.महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल या महाभागाने केलेले वक्तव्य त्याच्या बौद्धिक दिवाळखोरीचे प्रतिक आहे.अशा प्रवृत्तीच्या मानसिकतेला वेळीच ठेचण्याची आवश्यकता आहे.सोलापूरकर विरोधात ॲट्रॉसिटी दाखल करीत त्याला अटक करण्याची मागणी बहुजन समाज पक्षाचे प्रदेश महासचिव आणि पश्चिम महाराष्ट्र प्रभारी डॉ.हुलगेश चलवादी यांनी आज, शनिवारी (ता.१५) केली.

             सोलापूरकर कुणाकडून ‘लाच’ घेवून अशाप्रकारचे आक्षेपार्ह वक्तव्य करीत आहे, हे तपासण्याची देखील आवश्यकता आहे.अशाप्रकारचे वक्तव्य करीत समाजामध्ये संभ्रम आणि तेढ निर्माण करण्यासाठी कार्यरत शक्तीला देखील समोर आणण्याची गरज आहे. त्यामुळे सोलापूरकराचा माफीने भागणार नाही.पुरोगामी महाराष्ट्रातील अशा मानसिकतेला वेळीच ओळण्याची गरज आहे. महापुरूषांबद्दल केलेल्या आक्षेपार्ह व्यक्तव्यामुळे समाजामध्ये निर्माण होणारा संभ्रम आणि रोष दूर करण्यासाठी विशेष प्रयत्नांची आवश्यकता आहे.राज्य सरकारने यासंदर्भात विशेष लक्ष घालण्याची गरज असल्याचे मत डॉ.चलवादी यांनी व्यक्त केले.

            सोलापूरकरला त्यांच्या वक्तव्यानंतर राज्य सरकारने पोलीस सरंक्षण देवून शिवभक्त आणि आंबेडकरी अनुयायांच्या जखमांवर मीठ चोळण्याचे कार्य केले आहे.ज्याची जागा तुरूंगात आहे, त्याला पोलीस संरक्षण देण्याची वेळ येणे हेच सरकारचे अपयश आहे, असे डॉ.चलवादी म्हणाले. बहुजन समाज पक्ष ‘बहुजन हिताय,बहुजन सुखाय’ या विचाराने प्रेरित होवून सर्वांसाठी कार्य करण्यात अग्रेसर आहे. बसपचा कॅडर त्यामुळे अशाप्रकारच्या प्रवृत्तीला वेळीच रोखण्यासाठी सक्षम आहे.वेळ पडल्यास घटनात्मक मार्गाने या मानसिकतेविरोधात लढा दिला जाईल, असे देखील चलवादी यांनी यानिमित्ताने स्पष्ट केले.