आळंदीतील बेकायदेशीर खासगी वारकरी शिक्षण संस्था बंद करण्याचे आदेश… — महीला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांची आळंदीत बैठक…

दिनेश कुऱ्हाडे 

   उपसंपादक

आळंदी : तिर्थक्षेत्र आळंदीत मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या अनधिकृत बेकायदेशीर खासगी वारकरी शिक्षण संस्थांमधून बाल लैंगिक अत्याचाराचे गुन्हे मोठ्या प्रमाणात उघडकिस येऊ लागल्यामुळे आळंदीकर ग्रामस्थ आक्रमक झाले असून त्यांनी या विरोधात आवाज उठविला असून आळंदीतील अशा बेकायदेशीर खासगी वारकरी शिक्षण संस्था तातडीने बंद करा अशी मागणीच आळंदीकर ग्रामस्थांनी महीला आयोगाकडे केली होती.

         त्याच अनुषंगाने महीला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी आळंदीत संबंधित सर्व विभागातील अधिकाऱ्यांची मिटींग आयोजित करण्यात आली होती.

         यामध्ये ४८ तासात सर्व बेकायदेशीर खासगी वारकरी शिक्षण संस्थांवर कारवाई करुन बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहे.सदर आदेशाबाबत संबंधित प्रशासनाकडून दिरंगाई झाल्यास अधिकाऱ्यांवर सुद्धा कारवाई करण्यात येईल असे महीला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी सांगितले. 

        आळंदीकर ग्रामस्थ यांनी राज्य महिला आयोगाकडे निवेदन दिले होते.यामध्ये गेल्या काही महिन्यांपासून वारकरी संप्रदायाच्या अलंकापुरी नगरीत लैंगिक अत्याचाराच्या अनेक घटना समोर आल्या आहेत.

        संबंधित आरोपींवर कारवाई करण्यात आली पण धर्मादाय आयुक्त व महिला व बालकल्याण विभागाकडून कोणतीही परवानगी न घेता अनधिकृत अनेक संस्था सुरू करण्यात आल्या आहेत. राज्यभरातून मोठ्या प्रमाणात विद्यार्थी वारकरी सांप्रदायिक शिक्षण घेण्यासाठी आळंदीत येतात. येथे असलेल्या अनेक वारकरी शिक्षण संस्था धर्मादाय कार्यालयात नोंदणी करतात. मात्र, यातील अनेक संस्था अनधिकृत असून त्यांच्यावर कोणताही प्रशासकीय अंकुश नाही. अशा संस्थांमध्ये सेवा-सुविधांचा अभाव असल्याने विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागते.

        याशिवाय, या संस्थांमधील गैरप्रकारामुळे मुलांवरील अत्याचार वाढत आहे.या अनाधिकृत संस्था तातडीने बंद करा अशी मागणी आळंदीकर ग्रामस्थांची होती.

          यावेळी महीला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी काही खासगी वारकरी संस्थांना व शाळांना संबंधित अधिकाऱ्यांसह पाहणी केली व ज्या संस्था अनधिकृत आहेत त्यावर कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या.