दिनेश कुऱ्हाडे
उपसंपादक
पुणे : संतोष देशमुख हत्या प्रकरण, खंडणी, वाल्मिक कराड गँगशी संबंध आदी मुद्यांवरून अडचणीत आलेले मंत्री धनंजय मुंडे यांची पाठराखण करणे दुर्दैवी आहे. भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी गुन्हेगारीचे समर्थन करणारी भूमिका मांडली असून, याचा आम्ही निषेध करतो.
याप्रकरणी नामदेव शास्त्री यांनी त्वरित वारकरी संप्रदायाची माफी मागावी; अन्यथा शास्त्री यांच्याविरोधात राज्यभर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रवादी आध्यात्मिक व वारकरी आघाडीने सोमवारी पत्रकार परिषदेत दिला.
राष्ट्रवादी आध्यात्मिक व वारकरी आघाडीचे राज्यप्रमुख हभप विठ्ठल आबा मोरे यांनी पत्रकार परिषद घेऊन शास्त्री यांच्या भूमिकेचा निषेध करत दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली.
पुणे जिल्हा अध्यक्ष हभप समाधान महाराज देशमुख, राज्य उपाध्यक्ष मुबारकभाई शेख, राज्य युवासंपर्कप्रमुख हभप सुरज महाराज लवटे, आळंदी शहर अध्यक्ष हभप दत्तात्रेय महाराज साबळे, मुस्लिम संत विभागाचे संपर्कप्रमुख राजूभाई इनामदार, जिल्हा संघटक हभप आकाश महाराज जगताप, पुरंदर तालुका अध्यक्ष हभप तुकाराम पवार, सुपा प्रांत अध्यक्ष हनुमंत चांदगुडे, उपाध्यक्ष ऋषिकेश गाडेकर, बारामती तालुका अध्यक्ष रामचंद्र चांदगुडे, इंदापूर तालुका अध्यक्ष हभप दत्ता अर्जुन आदी उपस्थित होते.