दिक्षा ललिता देवानंद कऱ्हाडे
वृत्त संपादिका
चंद्रपूर 31 डिसेंबर – चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे एकदाच वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकवर कारवाई सुरू असुन उपद्रव शोध पथकाद्वारे रामनगर येथील साई पान शॉप येथे कारवाई करून खर्ऱ्यासाठी वापरण्यात येणाऱ्या सुमारे 180 किलो प्लास्टिक पन्नी जप्त करण्यात आल्या तसेच संबंधितांवर 5 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
बंदी असलेल्या व एकदाच वापर करता येणाऱ्या प्लास्टिकवर कारवाई करण्यासाठी आयुक्त तथा प्रशासक विपीन पालीवाल यांच्या निर्देशानुसार 8 टीम्स बनविण्यात आल्या आहेत. या सर्व चमूंद्वारे शहरात नियमित कारवाई करण्यात येते. यावेळेस सुद्धा या दुकानासंबंधी गुप्त माहिती मनपास प्राप्त झाली होती.
प्लास्टीक साठा,पिशव्यांची माहीती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवण्यात येत असुन दिलेली माहीती खरी निघाल्यास 5 हजारांचे बक्षिस दिल्या जात असल्याने अनेक सुजाण व्यक्तींकडुन अवैध साठ्यासंबंधी तक्रारी मनपास प्राप्त होत आहेत.
एकदाच वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकच्या वस्तूंचे उत्पादन, आयात, साठवणूक, वाहतूक, वितरण, विक्री व वापरावर राज्यात 1 जुलै 2022 पासून पूर्णपणे बंदी घालण्यात आली असुन महाराष्ट्र प्लास्टिक आणि थर्माकोल अधिसूचना 2018 नुसार पाचशे रुपये जागेवरच दंड, संस्थात्मक पातळीवर 5 हजार रुपयांपर्यंत दंड,दुसऱ्यांदा वापर केल्यास 10 हजार रुपये, तर तिसऱ्यांदा गुन्हा केला तर 25 हजार रुपये दंड आणि 3 महिन्यांच्या कारावासाची शिक्षा आहे.
सदर कारवाई आयुक्त विपीन पालीवाल यांच्या मार्गदर्शनात अतिरिक्त आयुक्त चंदन पाटील, उपायुक्त रवींद्र भेलावे व उपायुक्त मंगेश खवले यांच्या प्रत्यक्ष नियंत्रणात डॉ.अमोल शेळके,स्वच्छता निरीक्षक शुभम खोटे,शुभम चिंचेकर,राहुल गगपल्लिवर, प्रफुल पोतराजे यांनी केली.