जल वाचवण्यासाठी सर्व घटकांचा समावेश आवश्यक : जलपुरुष डॉ.राजेंद्र सिंग… — चला जाणू या नदीला अभियानांतर्गत सेवाग्राममध्ये तीन दिवशीय कार्यशाळेचे आयोजन….

दिनेश कुऱ्हाडे

  उपसंपादक

पुणे : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त राज्यातील नद्या अमृत वाहिनी करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. हा संकल्प पुर्ण करण्याकरीता समाजातील सर्व स्तरातील लोकांना सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे, असे प्रतिपादन जलपुरुष डॉ.राजेंद्र सिंह यांनी केले.

          चला जाणू या नदीला अभियानांतर्गत सेवाग्राम येथील यात्री निवासात तीन दिवशीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यशाळेच्या दुसर्‍या दिवशी डॉ.राजेंद्र सिंह राज्यातील नदी प्रहरी व नदी समन्वयकांसोबत संवाद साधतांना ते बोलत होते. अध्यक्षस्थानी अभियानाच्या राज्य समितीचे राज्य अशासकीय कार्यकारी सदस्य जयाजी पाईकराव होते. प्रमुख पाहुणे म्हणून रमाकांत कुलकर्णी, नरेंद्र चूग, विनोद बोधनकर, मिशन 500 चे उज्वल चव्हाण, नदी समन्वयक भरत महोदय, मुरलीधर बेलखोडे, सुनील रहाणे, इंद्रायणी सेवा फौंडेशनचे अध्यक्ष विठ्ठल शिंदे व पुरुषोत्तम महाराज हिंगणकर उपस्थित होते.

         देशाला वारंवार भेडसावणार्‍या पूर आणि दुष्काळ मुक्तीसाठी नदी संवाद यात्रा फार महत्त्वाची ठरणार आहे. नदीला जाणून घेणे, तिच्या समस्यांचा अभ्यास करणे, तिला पुन्हा तिचे मुळ स्वरूप प्राप्त करून देण्यासाठी अभियान अतिशय उपयुक्त आहे, असे जलपुरुष डॉ.राजेंद्र सिंह यांनी पुढे बोलतांना सांगितले. महाराष्ट्रात विकास झाला. परंतु, आज नदीचे दुःख जाणून घेणे आवश्यक आहे. नद्या घाण होऊ नये, त्या प्रवाही व्हाव्यात यासाठी यावेळी मान्यवरांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमासाठी विजय आढाव, सतिश इंगोले, विनेश काकडे, विपुल मून, अजय रोकडे यांनी परिश्रम घेतले. यावेळी डॉ.राजेंद्र सिंह व विठ्ठल शिंदे व इतर मान्यवरांच्या हस्ते सेवाग्राम आश्रम परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.