
दिनेश कुऱ्हाडे
उपसंपादक
पुणे : राष्ट्रपिता महात्मा गांधी पुण्यतिथीनिमित्त महाराष्ट्र गांधी स्मारक निधीतर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.सकाळी साडेआठ वाजता सामुदायिक प्रार्थना,भजन कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. खासदार सुप्रिया सुळे, गांधी स्मारक निधीचे विश्वस्त डॉ.शिवाजीराव कदम, अॅड.अभय छाजेड, एम.एस.जाधव, अन्वर राजन, डॉ.लक्ष्मीकांत देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती.
महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे अध्यक्ष डॉ.कुमार सप्तर्षी हे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.खा.सुळे यांनी आणि उपस्थित मान्यवरांनी महात्मा गांधी यांच्या पुतळयाला पुष्पहार अर्पण केला.
खा.सुप्रिया सुळे म्हणाल्या, ‘महात्मा गांधी पुढील पिढीला कळले पाहिजेत, नव्या पिढीला त्यांच्या भाषेत पोहोचवले पाहिजेत. त्यांचा किमान एक गुण अंगात बाणवला पाहिजे. प्रार्थना ही वैय्यक्तिक बाब आहे. तशीच राहिली पाहिजे.आजही देशाला गांधी, विनोबांच्या विचारांची गरज आहे. कॉ.गोविंद पानसरेंचे खुनी जामीनावर सुटलेत. गौरी लंकेश, डॉ.दाभोळकर यांच्या बाबतीत काय झाले, हे आपण पाहिले आहे. श्रद्धा जरूर असावी, अंधश्रध्देने सर्वांचा नाश होतो, महिला मागे पडतात. आमची श्रध्दा पांडुरंगावर आहे, त्यांच्या आणि आमच्या भेटीत आम्हाला मध्यस्थ लागत नाही.
सद्यस्थितीवर बोलताना खा. सुळे म्हणाल्या,’कै.संतोष देशमुख यांच्या मुलीचे अश्रू बघवले नसते. आज काही जणांच्या मांडीला मांडी लावून बसू शकलो नसतो.पक्षाचे विभाजन झाले, हे बरेच झाले.आता सत्ताधारी म्हणतात,आम्हाला नैतिकता शिकवू नका. देशात,राज्यात वातावरण अत्यंत बिघडले आहे.नैतिकतेची ही लढाई सातत्य ठेवून, विचारांशी ठाम राहून लढली पाहिजे’.
‘गांधी भवन ही वास्तू प्रत्येक पुणेकराचे घर, माहेर झाले पाहिजे. माझ्याशी संबंधित शाळांमध्ये,रयत शिक्षण संस्थेत गांधीजींच्या प्रार्थना होतील,याचा मी प्रयत्न करणार आहे. संविधानाच्या चौकटीत राहून समाजात बदल घडवले पाहिजेत, असेही खा.सुळे यांनी सांगितले.