उपक्षम रामटेके
मुख्य कार्यकारी संपादक
शुभम गजभिये
विशेष प्रतिनिधी
‘कविता ह्या नुसत्या कविता न राहून त्यातून समाजप्रबोधनाचे कार्य व्हायला हवे,मन आणि मेंदूने त्यावर उत्स्फूर्त प्रतिक्रिया द्यायला हवी आणि त्यातून माणसाचा विवेक जागृत व्हायला हवा असे कवयित्रीचे स्पष्ट मत आहे…
म्हणूनच ‘बोलत राहिले पाहिजे…’ या कविता संग्रहातून जाणीवा पेरण्याची छोटासा प्रयत्न कवयित्री करते आहे…
‘बोलत राहिले पाहिजे…’ ही या कवितासंग्रहाची प्रतिनिधीक कविता असून ती कुटुंबापासून देशपातळीपर्यंत अशा व्यापक अर्थाने अर्थबोध देते.
आपल्या माणसांच्या हक्कासाठी,त्यांची सद्सद विवेकबुद्धी जागृत ठेवण्यासाठी आणि अन्यायाविरुद्ध प्रतिकार करण्यासाठी ही कविता नेतृत्व स्वीकारायला आवाहन करते.’ असे मनोगत कवियत्रिने आपल्या मनोगतात व्यक्त केले.
चंद्रपुरातील नवकवियत्री वैशाली धनविजय रामटेके यांच्या कवितासंग्रहाचे आणि लघुचित्रपटाचे स्क्रिनिंग प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला एन.डी.हॉटेलच्या प्रशस्त सभागृहात आयोजित केल्या गेले होते.
आंबेडकरी साहित्य प्रबोधिनी चंद्रपूर तसेच सूर्यांश साहित्य व सांस्कृतिक मंच चंद्रपूर आयोजित या कार्यक्रमात प्रसिद्ध कवी इरफान शेख यांनी प्रस्तावना करत कार्यक्रमाची रूपरेषा उत्तम प्रकारे मांडली.संस्थेचा उद्देश आणि कवयत्रीचे कर्तव्यशील व्यक्तिमत्त्व यावर त्यांनी भाष्य केलं.
प्रख्यात व्याख्याते,समीक्षक,मराठी विभागप्रमुख रा.तू.म. विद्यापीठ नागपूर डॉ.शैलेंद्र लेंडे या कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून उपस्थित होते.
‘सत्याच्या कणाकणांना स्पर्श करत’ कवयित्रीची कविता पुढे आली आहे.’व्यक्त होण्याला स्वतंत्र महत्त्व आहे,तिच संवेदना कवितासंग्रहातील या ७५ कवितामधून कवयित्रिने व्यक्त केली आहे. ‘बोलत राहिले पाहिजे…’ ही निर्मिती संवेदनशील,भावनाशील आणि खंबीर मनाची अभिव्यक्ती आहे.अशा भावना अध्यक्षीय स्थानावरून त्यांनी व्यक्त केल्या आणि कवयित्रीच्या उज्वल भविष्याला शुभेच्छा दिल्या.
यावेळी प्रसिद्ध कवी लोकनाथ यशवंत यांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले…
यावेळी कवी लोकनाथ यांनी व्यक्त होताना भाष्य केले की वैशाली रामटेके यांची कविता ही विचारकविता असून या कविता जागतिक प्रश्नांचा परामर्श घेताना दिसतात..भुकेचे अनेक संदर्भ घेवून त्यांनी लिहिलेल्या कविता ह्या मनाला विचार करायला भाग पाडतात.
यावेळी नरेंद्र जरोंडे, विधिसल्लागर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
प्रख्यात लेखक इसादास भडके,संध्याताई विरमलवार,अध्यक्षा संस्कार भारती चंद्रपूर,प्रसिद्ध चित्रकार सुदर्शन बारापात्रे यांनी पुस्तकावर भाष्य केले.
कवयित्रीच्या कवितांची निर्मिती ही तिच्या भावनाशील आणि संवेदनशील मनाचा प्रतीक आहे हे तेवढ्याच आत्मीयतेने त्यांनी मंचावरून सांगितलं.
खचाखच भरून असलेल्या या सभागृहात तेवढ्याच तोडीचा प्रेक्षक वर्ग अनुभवास मिळाला.पुस्तक प्रकाशनानंतर लगेच ‘बाबूजी’ संघर्ष एक गाथा या चित्रपटाची स्क्रीनिंग ठेवण्यात आली.
सोबतच चित्रपटातील कलाकार आणि संपूर्ण टीमचा सन्मानचिन्ह देवून सन्मान करण्यात आला.
या चित्रपटातील बाबूजी श्री.डोमाजी धनविजय हे स्वतः कवयित्रीचे वडील आहेत. त्यांचा जीवनसंघर्ष हा इतरांसाठी आदर्श आणि प्रेरणादायी आहे.
चित्रपटाची निर्मिती ही माहितीचित्रपटाचा उत्तम नमुना आहे’.असा प्रतिसाद सर्व प्रेक्षक वर्गाकडून पाहायला मिळाला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चंद्रपूर येथील अभिनेत्री सुमेधा श्रीरामे केले,आणि आभार मानसोपचारतज्ञ स्नेहा कोळगे मुंबई यांनी केले.
सभागृहातील व्यवस्थापन,कार्यक्रमाची उत्कृष्ट बांधणी,साहित्य समाज आणि चित्रपट या क्षेत्रातील अनेक मान्यवरांची उपस्थिती,प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद यातून पुस्तकाची आणि कवयित्रीची यशस्वीतेकडे वाटचाल सुरू राहील हे निदर्शनास आलं आणि कार्यक्रमाची सांगता झाली.