ग्रीनफ्रेंड्स तर्फे चैत्रपालवी तसेच जंगलातील रानफुलांचे दर्शन उपक्रम… — यासोबत केले उन्हाळी पक्षी व फुलपाखरे निरीक्षण…

 

चेतक हत्तीमारे

जिल्हा प्रतिनिधी 

लाखनी:-

 

   ग्रीनफ्रेंड्स नेचर क्लब तर्फे निसर्गप्रेमी विद्यार्थ्यांना निसर्गात विविध वनस्पतींना चैत्र व वैशाख महिन्यात येणाऱ्या नवीन पालवीचे दर्शन अर्थात चैत्रपालवीचे दर्शन लाखनी परिसरातील सभोवती असलेल्या जंगल भागात घडविण्यात आले. विविध तांबडी, नारिंगी, पोपटी,पिवळी,गर्द तपकिरी ,गर्द हिरवी,फिक्कट पिवळी रंगाच्या कोवळ्या लुसलुशीत चैत्रपालवीने वनसृष्टी न्हाऊन गेली असतानाचे विविधरंगी दृश्य निसर्गप्रेमी विद्यार्थ्यांना दाखविण्यात आले.याचेवेळी रानात उमलणाऱ्या विविध रानफुलांचे दर्शन सुद्धा निसर्गप्रेमी विद्यार्थ्यांना घडवून त्यांची विस्तृत माहिती देण्यात आली.निसर्गदर्शनासोबत 27 प्रकारच्या विविध पक्ष्यांच्या प्रजाती,6 प्रकारचे फुलपाखरे व अनेक प्रकारचे चतुर कीटक ,वनस्पती यांचा प्रत्यक्ष परिचय सुद्धा विद्यार्थ्यांना घडविण्यात आला.हे उपक्रम एप्रिल व मे या दोन्ही महिन्यात ग्रीनफ्रेंड्स तर्फे घेण्यात आला.या उपक्रमाला नेफडो जिल्हा भंडारा तसेच अभाअंनिस तालुका शाखा लाखनी जिल्हा भंडारा यांचे सुद्धा सहकार्य लाभले.

 यावेळी ग्रीनफ्रेंड्सचे कार्यवाह प्रा. अशोक गायधने यांनी अधिक माहिती देताना सांगितले की येणाऱ्या कणखर उन्हाची तीव्रता त्याचबरोबर येणाऱ्या पावसाळ्यातील तीव्र मान्सून पाऊस अधिक कणखरपणे सहन करण्यासाठी ऋतू बद्दलमध्ये अनेक वनस्पती फेब्रुवारी मार्च महिन्यात पानगळ करतात त्यानंतर चैत्र व वैशाख महिन्यात येणारी नवीन कोमल लुसलुशीत पालवी ग्रीष्म वैशाखच्या तीव्र उन्हाला झेलण्यासाठी तयार होते तसेच आगामी पावसाळी वातावरणाला सुद्धा तयार होते .त्यामुळे पावसाळ्यातील कमी उन्हात सुद्धा हया चैत्रपालवीच्या प्रकाश संश्लेषण व अन्न साठविणे क्रियेमुळे पावसाळयातील विपरीत स्थितीत सुध्दा वनस्पतीची वाढ योग्य प्रमाणात होत असते अशी माहिती त्यांनी दिली.यावेळी मोह ,कुसुम्ब,करंजी,अर्जुन,आंबा,पिंपळ,उंबर, बहावा, करू,कातटेसावर,इत्यादीची वसंतऋतू तसेच वैशाखातील चैत्रपालवीचे दर्शन प्रत्यक्षात घडविण्यात आले सोबतच रानात फुलबहार व सुवास पसरविणारे कुडयाची ,बहावाची, करंजी, कडूनिंब,आंबमोहोर,वड, पिंपळ इत्यादीचे रानफुले दर्शन सुद्धा घडविण्यात आले.यावेळी मातोश्री गोशाळा येथे भेट देऊन आमराईला सुद्धा क्षेत्र भेट देण्यात आली.

   या एप्रिल व मे च्या चैत्रपालवी निरीक्षणाला नयना पाखमोडे,यशस्वी कोमेजवार,दिव्यांशी भोवते, मेघा मळकाम, धरमसहारे, सुहानी पाखमोडे,भुमेश्वरी पाखमोडे,ओंकार आगलावे, आराध्या आगलावे इत्यादींनी या चैत्रपालवी निरीक्षण उपक्रमात सहभाग नोंदविला.