“माझं माझं गाढव ओझ” अशी एक जुनी म्हण आहे,याचा अर्थ माझं म्हणण्यातूनच डोक्यावर ताण पडतो.त्यातून दुःख निर्माण होते.माणूस ‘ माझं ‘ असे का म्हणतो? याचे कारण ‘मी ‘ आहे.मी म्हणजे अहंकार आणि माझं म्हणजे मोह.माणसाला अहंकार झाला की,मी मी करतो, माझं माझं म्हणतो.’ हे सारे माझेच ‘ आहे.हे मी निर्माण केलेले माझे वैभव आहे,शेती,कारखाना,उद्योग,व्यापार,संस्था,या साऱ्या भौतिक गोष्टीचा माणसाला अहंकार असतो.अहांकरापोटीच तो हे सारे माझे म्हणतो.माझी बायको,माझी मुलं,माझे नातेवाईक,माझे मित्र .हे सारे माझेच.याचा अर्थ.माझ्याच हक्काचे.या नात्यांवर व प्रॉपर्टी वर फक्त माझाच हक्क आहे.इतरांचा कुणाचाच होऊ शकत नाही.कारण हे सारे माझ्या नावाने नोंदले आहे.म्हणजे रजिस्टर आहे.या गर्वामुळे,अहंकारामुळे हे सारे माझे वाटायला लागते.परंतु मी आणि माझं या विचाराने माणूस सुख हरुन बसतो.आणि दुःखाचे ओझे आयुष्यभर वाहून वाहून शेवटी हे ओझे इथेच ठेऊन अंतर्धान पावतो.याचा अर्थ या पृथ्वी तलावरील प्रत्येक माणूस रिकाम्या डोक्याने आणि रिकाम्या हातानी येतो , सर्व कुटुंब प्रॉपर्टी कमावतो,आणि सोबत नेत नाही.नेता येत नाही.तर मग कमाई करण्याची गरज तरी काय ? गरज आहे.कारण निसर्गानेच माणसाला मन बुध्दी शरीर दिले आहे.त्याला भूक पण दिली आहे,ती नाही भागवली तर माणूस मरतो.
अन्न वस्त्र निवारा शिक्षण आरोग्य याच आवश्यक गरजा आहेत,त्या मिळाल्या की माणूस न थांबता तो सुखाच्या आणि त्या मिळाल्या की चैनीच्या गरजांकडे धाव घेतो.आणि इथेच त्याची चूक होते.कुठेतरी थांबले पाहिजे,नाही थांबले तर दुःखाची निर्मिती होते.आनंद नाहीसा होतो,हे माणसाला कळत नाही.ज्यांना कळले त्यांना वळत नाही.म्हणूनच संसार हा सुखाचा होण्याऐवजी दुखमय होतो.
माणूस या जगात येताना कोरा येतो,निष्पाप असतो,पण जसा जसा या जगाचा अनुभव घेतो,या जगाचे दर्शन घडते,तसा तसा निष्पाप माणूस हा पापी बनत जातो.दुसऱ्यांचे शोषण,अन्याय ,अत्याचार,भ्रष्टाचार,काळाबाजार,साठेबाजी इत्यादी अनेक पापे करून तो श्रीमंत होतो.याचे कारण बुध्द म्हणतो ‘ मोह ‘ हे मूळ कारण आहे.मोह हे दुःखाचे मूळ कारण आहे.मोहमुळेच अहंकार,क्रोध,द्वेष, माया,इत्यादी दुर्गुण निर्माण होतात.म्हणून मोह आवरावा,त्यास बळी पडू नये.अमर्याद जीवन न जगता मर्यादित जीवन जगावे.असे जीवन जगण्याने माणसाला दुःख होणार नाही.याचा अर्थ बुध्द हा दुःखचे मूळ कारण व्यक्तीची मानसिकता आहे,हे सांगतो.
मार्क्स हा जागतिक अर्थतज्ञ याचे विचारानुसार दुःखाचे मूळ कारण ‘ शोषण ‘ हे आहे,माणूस माणसाचे आर्थिक ,सामाजिक,राजकीय,मानसिक शोषण करतो,शोषणातून च विषमता निर्माण होते,आर्थिक ,सामाजिक,राजकीय विषमता ची व्यवस्थ निर्माण होते.सरकार व्यवस्थेचे संरक्षण करीत असते.विषमतेच्या रचनेत अन्याय अत्याचार गुन्हेगारी लोभ अहंकार यास खतपाणी मिळून माणसाचे दुर्गुण वाढीस लागतात.समतेच्या राज्यात,व्यवस्थेत दुर्गुण वाढीस संधी नसते.कारण कारण समतेच्या व्यवस्थेत खाजगी मालमत्ता चे निर्मूलन झालेले असते,त्यामुळे वर्गीय संघर्ष संपुष्टात येतो.गरीब मध्यम श्रीमंत अशी व्यवस्थाच नसते,त्यामुळे खालच्या वर्गातील व्यक्तीला वरच्या वर्गात जाण्याचा लोभच नसतो,आणि स्पर्धाही नसते.यामुळे ‘ मी आणि माझं ‘ हा विषयच समाप्त होतो.
मग रामदास महाराजास ‘ जगी सर्व सुखी असा कोण आहे ? ‘ हा प्रश्नच पडणार नाही.राहू तर सारेच दुःखी नाहीतर सारेच सुखी,असे वातावरण आणि मानसिकता तयार होईल,अर्थात कुणालाही भौतिक सुख नको,असे वाटत नाही.त्यामुळे सारेच जन भौतिक सुखासाठी म्हणजे प्रगती विकास यासाठी अर्थातच मानसिक आणि आर्थिक प्रगतीसाठी झटतील,नव्हे झटावेच लागेल.कारण अभावग्रस्त जीवनात दुःख असते.
दुखावरचा उपाय जसा बुध्द साहित्यात आणि मार्क्स साहित्यात वाचावयास मिळतो,तसेच संत साहित्यात आणि वैदिक साहित्यात पण वाचायला मिळतो.यात दुःखाचे मूळ कारण दैव ,मागच्या जन्मीचे पाप,आणि देवाची इच्छा ,हे सांगितले आहे,माणसाचा जन्म कुण्या वर्गात ,कुण्या जातीत,कुण्या धर्मात व्हावा हे देव ठरवीत असतो.त्यानुसार त्याला तो वर्ण वर्ग जात धर्म भोगणे प्राप्त आहे.दुःखातून मुक्ती हवी असेल तर माणूस जन्मात भरपूर पुण्य केले पाहिजे.आणि पुण्य म्हणजे शोषण करू नये ,अन्याय,अत्याचार करू नये,नैतिकतेचा व्यवहार करावा,दुसऱ्यास दुःख होईल असे बोलू नये,वर्तन करू नये.असा उपदेश दुखमुक्तीचा या साहित्यात वर्णिला आहे.पण पुण्य मिळविल्याने या जन्मात दुःख निर्मूलन होणार नाही.पुण्य तुमच्या खात्यात जमा होऊन पुढील जन्मी ते उपयोगी होईल,असे म्हंटले आहे.आणि कथा कीर्तन पोथी द्वारे या विचाराची मानसिकता लोकात रुजविण्यात हे साहित्य यशस्वी झाले आहे.परंतु हजारो वर्षाचा हा उपदेश माणसाला.दुखमुक्ती देऊ शकला नाही,हेही तितकेच सत्य आहे.
खरे तर बुध्द साहित्य,कार्ल मार्क्स चे साहित्य ,वैदिक साहित्य हे तिन्हीही वाचकाने वाचायला हरकत नसावी.पण तेच वाचून तेच प्रमाण न मानता तिन्ही साहित्याचा तुलनात्मक अभ्यास करावा.आणि ते सत्याच्या व्यवहाराच्या कसोटीवर उतरेल का ? याचा अभ्यास वाचकांनी करावा,असे माझे मत.