प्रत्येक हिंदूने आता धर्माच्या रक्षणासाठी पुढे आले पाहिजे :- मंत्री नितेश राणे… — आळंदी येथे ‘हिंदु महोत्सव २०२५’ कार्यक्रमाचे आयोजन…

दिनेश कुऱ्हाडे 

   उपसंपादक 

आळंदी : आज हिंदु धर्मावर वक्फ बोर्ड, लव्ह जिहाद, धर्मांतर, तसेच देवतांचा अवमान अशा प्रकारचे आघात होत आहेत. हिंदुत्वाचे कार्य करणारे कार्यकर्ते आणि संघटना यांनीच केवळ धर्मरक्षणाचे काम करून उपयोग नाही, तर प्रत्येक हिंदूने आता धर्माच्या रक्षणासाठी पुढे आले पाहिजे.

          आताचे सरकार हिंदुत्वनिष्ठ विचाराचे असून हिंदुत्वाच्या रक्षणासाठी कटीबद्ध आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्राचे मत्स्यव्यवसाय आणि बंदर विभागाचे मंत्री नितेश राणे यांनी केले. सर्वधर्मसमभावाच्या नावाखाली हिंदूंवर होणारी दडपशाही खपवून न घेता आता वर्षातून ३६५ दिवस हिंदु राष्ट्र म्हणून साजरे झाले पाहिजे, असेही मत नितेश राणे यांनी व्यक्त केले. 

             हभप संग्रामबापू भंडारे व निलेश बोराटे यांनी श्री रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याच्या वर्धापनदिनाच्या निमित्त सकल हिंदु समाजाच्या वतीने आळंदी येथील फ्रूटवाले धर्मशाळेच्या प्रांगणात ‘हिंदु महोत्सव २०२५’ कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

          यावेळी सुप्रियाताई साठे, ज्ञानेश्‍वर बनसोडे, रवि पडवळ, संतोष लोखंडे, गणेश गरुड या वक्त्यांचेही या वेळी मार्गदर्शन झाले. या वेळी मंगेश चिवटे, तानाजी जाधव, अनिकेत घुले, मिलिंदभाऊ एकबोटे, सागर बेग, कुणाल साठे, तसेच आळंदी येथील विविध वारकरी शिक्षण संस्थेचे प्रमुख, कीर्तनकार, प्रवचनकार आणि हिंदु बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

          मंत्री नितेश राणे म्हणाले की, “मुंबईत बांग्लादेशी काय करत आहेत? ते सैफ अली खानच्या घरात घुसले. आधी फक्त नाक्यावर उभे राहायचे आता घरात घुसायला लागले आहेत. कदाचित त्याला घेऊन जायला आले असतील. सैफ अली खान असा चालत होता की, खरंच चाकू मारला की, ॲक्टिंग करून बाहेर आला, असा मलाच संशय आला.

           जेव्हा कुठल्याही ‘खान’ला त्रास होत असेल तेव्हा सगळेच बोलतात. पण कुठलाही हिंदू कलाकार असो किंवा सुशांत सिंग राजपूत प्रकरणावर मुंब्राचे जितुद्दीन आणि बारामतीच्या ताई बाहेर आल्या नाहीत. त्यांना सैफ अली खान आणि शाहरुख खानचा मुलगा आणि नवाब मलिक यांचीच चिंता आहे,” अशी टीकाही त्यांनी केली.