भारतीय समाजव्यवस्थेची आव्हाने ओळखून सामाजिक शास्त्राच्या अभ्यासक्रमाची पुनर्रचना करावी :- प्रा. डॉ.नारायण कांबळे…

      रामदास ठुसे 

नागपूर विभागीय प्रतिनिधी 

        नव्या शैक्षणिक धोरणामध्ये भारतीय समाज व्यवस्थेपुढील आव्हाने ओळखून त्या आव्हानाला सामोरे जाण्यासोबतच रोजगारांच्या संधी उपलब्ध करून देणाऱ्या व्यवसायाभिमुख प्रकारच्या अभ्यासक्रमाची पुनर्निर्मिती करणे काळाची गरज आहे. असे आव्हान स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडचे समाजशास्त्र अभ्यास मंडळाचे अध्यक्ष तथा विद्या परिषदेचे सदस्य प्रा. डॉ. नारायण कांबळे यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाविद्यालय, चिमूर जिल्हा चंद्रपूर येथे एक दिवशीय अंतरविद्याशाखीय राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी व्यक्त केले.

           भारतीय समाजव्यवस्थेपुढे कोणती नवी आव्हाने उभी राहिली आहेत, हे पाहणे महत्त्वाचे ठरते. भारतातील काही विचारवंतांच्या मते आजही आंतरराष्ट्रीय प्रवाह व त्यातून उभी राहणारी आव्हाने याचा विचार करण्यापेक्षा आपण आपली अस्मिता पुढे आणणे जास्त महत्त्वाचे आहे. जागतिकीकरणाच्या आजच्या पर्वात असा अलगतावादी दृष्टिकोन ठेवता येईल का? नव्या संकल्पना, नवे प्रवाह यांना सामोरे जाऊन, प्रसंगी त्यातील काही स्वीकारून, काही नाकारून, पुढे जाता येईल. नाहीतर आपण पुन्हा नव्या एका नव्या वसाहतवादी, वर्चस्ववादी चौकटीत अडकून पडू. तसे होऊ नये म्हणून काळाची आव्हाने लक्षात घेऊन नव्याने पुढे आलेल्या समस्यांना सामोरे जाण्यासाठी व ती आव्हाने पेलवण्याची क्षमता निर्माण करणारी अभ्यासक्रमाची पुनर्रचना करण्याची या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये काळाची गरज आहे, असे आवाहन प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना याप्रसंगी व्यक्त केले.

           या राष्ट्रीय परिषदेमध्ये शोधनिबंधाच्या अंकाचे प्रकाशन प्रमुख पाहुणे व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गांधी सेवा शिक्षण समिती, चिमूर संस्थेचे अध्यक्ष डॉ. दीपक यावले हे होते, प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे सचिव विनायकराव कापसे संस्थेचे कोषाध्यक्ष प्रा. मारोतराव भोयर ब्रीजभाषक, प्रा. डॉ. संतोष बनसोड, अमरावती, प्रा. डॉ. नारायण कांबळे हे होते.

          तर राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटक गोंडवाना विद्यापीठाच्या मानव्यविद्या शाखेचे अधिष्ठाता प्रा.श्याम खंदारे यांच्या हस्ते संपन्न झाले, तर विचारपीठावर व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. संजय गोरे, प्राचार्य डॉ. अश्विन चंदेल. व इतर मान्यवर उपस्थित होते.

       या एक दिवसीय आंतरविद्याशाखीय राष्ट्रीय परिषदेचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रफुल राजुरवाडे यांनी केले, तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. आशुतोष पोपटे व आभार समाजशास्त्र विभाग प्रमुख प्रा. पितांबर पिसे यांनी केले.

            या परिषदेसाठी देशभरातून अनेक प्रतिनिधी सहभागी झाले होते. ही परिषद यशस्वी करण्याकरिता इतिहास विभाग प्रमुख प्रा. डॉ.प्रफुल राजुरवाडे समाजशास्त्र विभाग प्रमुख प्रा. पितांबर पिसे राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. कत्रोजवार व महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.