दिक्षा ललिता देवानंद कऱ्हाडे
वृत्त संपादिका
चंद्रपुर महानगरपालिका,सहाय्यक संचालक (कुष्ठरोग), लेप्रा सोसायटी तेलंगना यांच्या वतीने कुष्ठरोगाची मुलभुत शास्त्रीय माहिती व कुष्ठरुग्णाने घ्यावयाची हातापायाची काळजी या बाबतची दिनदर्शिका तयार करण्यात आली असुन महानगरपालिका क्षेत्रातील कुष्ठरुग्णांना तसेच इतर नागरिकांना या दिनदर्शिकेचे वाटप 16 जानेवारी रोजी झालेल्या कार्यक्रमात करण्यात आले.
सन 2027 पर्यंत शून्य कुष्ठरोग प्रसारचे ध्येय साध्य करणे हे राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मुलन कार्यक्रमाचे उद्देश आहे. त्यादृष्टीने आरोग्य यंत्रणेमार्फत कुष्ठरोग निर्मूलनासाठी येत्या 30 जानेवारी ते 13 फेब्रुवारी या कालावधीत ‘स्पर्श’ कुष्ठरोग जनजागृती अभियान राबविण्यात येणार असून ‘कलंक कुष्ठरोगाचा मिटवू या, सन्मानाने स्वीकार करू या’ असे या वर्षी राबविण्यात येणाऱ्या ‘स्पर्श’ कुष्ठरोग जनजागृती अभियानाचे घोषवाक्य आहे.
राज्यातील ग्रामीण व दुर्गम भागात तसेच ज्या जिल्ह्यात कुष्ठरोग झालेल्या रुग्णांचे प्रमाण जास्त आहे त्या जिल्ह्यांवर या अभियानात अधिक लक्ष देण्यात येणार आहे. शालेय विद्यार्थ्यांची तपासणी करून त्यांचा या अभियानात अधिकाधिक सहभाग वाढवून प्रोत्साहन देण्यात येणार आहे.
त्याचप्रमाणे कुष्ठरोग शोध अभियानाच्या माध्यमातुन समाजातील लोकांमध्ये कुष्ठरोगाबाबतचे गैरसमज, अंधश्रध्दा, भिती आहे ती दुर करुन हा आजार इतर आजारासारखाच सामान्य आजार आहे, ही भावना त्यांच्या मनात रुजविण्यासाठी दिनदर्शिका तयार करण्यात आली आहे.
16 जानेवारी रोजी महानगरपालिका क्षेत्रातील कुष्ठरुग्णांना तसेच सामान्य नागरिकांना या दिनदर्शिकेचे वाटप करण्यात आले. सदर कार्यक्रमात रुग्णांच्या आवश्यकतेनुसार अल्सरकिट व एम.सी. आर चप्पल यांचे वितरण आयुक्त विपीन पालीवाल यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी वैद्यकिय आरोग्य अधिकारी डॉ. नयना उत्तरवार व डॉ. संदिप गेडाम, सहाय्यक संचालक, आरोग्य सेवा, कुष्ठरोग,शहरी आरोग्य केंद्राचे वैद्यकिय अधिकारी व कुष्ठरोग कार्यालयातील कर्मचारी वृंद उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचलन श्री. पी. के. मेश्राम व आभार प्रदर्शन श्री. आर. एस त्रिपुरवार यांनी केले.