
दिनेश कुऱ्हाडे
उपसंपादक
पुणे : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक वंदनीय छत्रपती श्री शिवाजी महाराज यांचा जाज्ज्वल्य इतिहास घरोघरी पोहोचवण्यात पुणे शहराचा मोठा वारसा राहिलेला आहे. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, निनादजी बेडेकर, गो.नि. दांडेकर अशी ही परंपरा आता सौरभ कर्डेसारख्या तरुण लेखकाच्या हाती आहे. सौरभची तीनही पुस्तके आपला जाज्वल्य इतिहास अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचण्यास महत्त्वाचा धागा ठरतील, हा विश्वास केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केला.
सौरभ कर्डे लिखित ‘छत्रपती शिवराय आणि स्वराज्य’, ‘सरसेनापती हंबीरराव मोहिते’ आणि ‘वाघ दरवाजा’ या तीन पुस्तकांचे प्रकाशन केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि अभिनेता दिग्दर्शक श्री. प्रवीणजी तरडे यांच्या विशेष उपस्थितीत करण्यात आले.
यावेळी कसबा विधानसभेचे आमदार हेमंतजी रासने, जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचे ११ वे वंशज ह.भ.प.शिरिष महाराज मोरे (देहुकर), शिवसृष्टीचे विश्वस्त श्री. विनीतजी कुबेर, स्नेहल प्रकाशनचे श्री. रवींद्रजी घाटपांडे यांच्यासह इतिहास प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सध्याच्या काळात राजकारणात निष्ठा कुठेही दिसत नसल्याची खंत शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी व्यक्त केली. ते म्हणाले, ‘सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अपार निष्ठा होती. अशा अठरापगड जाती धर्मातील कित्येक लोकांच्या हजारो हातांनी स्वराज्य घडविण्याचे काम केले. म्हणूनच त्यांनी दिलेले योगदान महत्त्वाचे आहे.