शुभम गजभिये
विशेष प्रतिनिधी
उमरखेड : भरधाव वेगातील एका टिप्परने महाविद्यालय आटोपून घराकडे निघालेल्या दुचाकीस्वार विद्यार्थ्याला मागून जबर धडक देत उडविले.
या अपघातात या विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना येथील बाळदी रस्त्यावरील आयटीआय कॉलेजजवळ घडली.
अजित गजानन राठोड (१९) रा. कृष्णापुर तांडा ता. उमरखेड असे मृतक विद्यार्थ्याचे नाव आहे. तो इयत्ता ११ वीत गोपिकाबाई सीताराम गावंडे महाविद्यालयात शिकत होता.
सदर अपघाताची फिर्याद मृतकाचे वडील गजानन गोकुळ राठोड (४०) यांनी पोलीस स्टेशनला दिली. आज सकाळी ७ वाजता अजीत हा घरून एमएच २९ सीजी ३५१९ या क्रमांकाच्या दुचाकीने कॉलेजमध्ये गेला होता. कॉलेजचे पुर्ण तास केल्यानंतर तो बाळदीमार्गे आपल्या गावी कृष्णापुर तांडा येथे जाण्यासाठी निघाला.
दरम्यान कॉलेजवरुन अवघ्या २ मिनिटाच्या अंतरावरील औद्योगीक शासकीय प्रशिक्षण केन्द्राजवळ मागुन भरधाव वेगाने येणाऱ्या एमएच ४८ टी ५५८० या क्रमांकाच्या टिप्परचालकाने अजितच्या दुचाकीला जबर धडक दिली.
ही धडक एवढी जबरदस्त होती की,टिप्परचे चाक त्याच्या डोक्यावरून गेल्याने त्याचा जागेवरच मृत्यू झाला.माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळावर भेट दिली. सदर अपघातामुळे कृष्णापुर तांडा गावावर शोककळा पसरली असून अजितच्या अपघाती मृत्यूमुळे हळहळ व्यक्त होत आहे.