गडचिरोलीतील नंदनवन बेचिराख होणार : आदिवासी संस्कृती व नैसर्गिक सौंदर्याचे आपल्या मुलांना एकदा शेवटचे दर्शन घडवा…  — देशभरातील पर्यावरण आणि लोकशाहीवादी जनतेला भावनिक आवाहन…

ऋषी सहारे 

   संपादक

गडचिरोली : हजारो वर्षे पूरातन, कृषीपूर्व समाज असलेल्या माडिया गोंडांची संस्कृती, बोलीभाषा आणि त्यांनी पिढ्यानपिढ्या राखलेली नैसर्गिक साधनसंपत्ती यामुळे आपल्या वेगळेपणासाठी देशातच नव्हे तर जगात अतिअसूरक्षित (PVTG) मुळनिवासी जमात म्हणून ओळख असलेल्या माडिया गोंडांचा अधिवास सध्या धोक्यात आला आहे. या अधिवासाला भारतीय संविधानाच्या पाचव्या अनुसूचीने संरक्षित ठेवण्याचा प्रयत्न आता भांडवली काळाने हाणून पाडला आहे. विकास नावाच्या भांडवली काळाची नजर गडचिरोलीवर पडली आणि या नंदनवनाला ग्रहण लागले. 

          देशात कायदे आणि नियमांचे राज्य असतांना गडचिरोलीत मात्र गेल्या दशकभरात पाचवी अनुसूची, पेसा, वनाधिकार, जैविक विविधता, वनसंवर्धन, खाण व खनिजे यासारखे कायदे आणि त्याअंतर्गतचे नियम डावलून येथील साधनसंपत्ती ओरबाळण्याचे काम सुरू झाले. शासन, प्रशासन, सरकारला कायदे – नियम सांगत हे थांबविण्यासाठी आंदोलन, मोर्चे करणाऱ्यांवर थेट नक्षल समर्थक असल्याच्या भावनेने गुन्हे दाखल करत जेलात डांबण्याचे काम केले गेले.

          दुसरीकडे पैसे, रोजगार, विकास, प्रगतीची आस दाखविली जावून सुरजागडात एक भलीमोठी खदान खोदल्या गेली आणि भांडवली राक्षसाची भूक आणखीनच वाढली. ती आता इतकी वाढली की आता लोह खाणींसाठी ‘स्पेशल मायनिंग झोन’ ‘स्टील इंडस्ट्रीज’साठी जिल्ह्यातील कोरची आणि एटापल्ली – भामरागड तालुक्यातील लाखो एकरवरचे जंगल सपाट करणे सुरू केले आहे. हे लोह अयस्क वाहतूक करणे सोईचे व्हावे म्हणून दोन मोठे राष्ट्रीय महामार्ग सुध्दा जिल्ह्यातून जाणार आहेत.

           या साऱ्यांमध्ये कुणाची आडकाठी नको म्हणून रोजगाराचे गाजर दाखवून जगातील अनेक देशांमध्ये ‘बॅन’ असलेले, अतिउच्चकोटीचे प्रदुषणजन्य ‘स्पाॅन्ज आयर्न’चे कारखाने बसवले जाणार आहेत. या साऱ्या कोलाहलात देशातील अतिअसूरक्षित माडिया गोंडांची संस्कृती – सभ्यता, बोलीभाषा, त्यांचे देव – देवता, पोलवा – पंडुम, गोटूलची सारी संस्कृती जंगलाअभावी पोरकी होणार आहे. १८८२, १९०२ चा व १९३५ च्या इंडिया एक्ट मध्ये ‘पार्टली आणि फुल्ली एक्स्लुडेड’ तरतूद होवून ज्या अतिअसूरक्षित जमातीला आपली ‘हेबीटेट राॅईट्स’ आपली संस्कृती, संसाधने ब्रिटीश राजवटीतही अबाधित राखता आली.

           त्याच माडिया गोंडांना आणि पारंपरिक स्थानिकांना आता पाचवी अनुसूची – पेसा कायदा अस्तित्वात असतांनाही वाचवता येणे अवघड होवून बसले आहे.

            पारंपारिक ईलाखे आणि मानवी सभ्यतेतील उच्चजीवनशैली, निसर्गातील डोंगर, दऱ्या, झरे आणि झाडांमध्ये देव मानण्याची परंपरा काल्पनिक मुर्तीत देव शोधणाऱ्या भांडवली राक्षसी काळाला ‘नगण्य’ वाटत असून याला संवैधानिक पध्दतीने विरोध करणाऱ्या आमच्या सारख्यांना प्रसंगी शहरी नक्षलवादी म्हणून जेलमध्ये डांबून गडचिरोलीची भूमी आता ‘मायनिंग झोन’ ‘ स्टील हब’साठी सपाट केली जाणार आहे.

          येणाऱ्या पाच सहा वर्षांत सुरजागड, दमकोंडवाही, मोरोमेट्टा, बिनागुंडा, झेंडेंपार, मुतनूर डोंगररांगा या लोखंडासाठी ओरबाडून टाकल्या जाणार आहेत. या डोंगरांसोबतच मानवी सभ्यतेतील उच्च कोटीची ‘गोटूल व्यवस्था’ विलुप्त होणार आहे. त्या अगोदरच हि गोटूल व्यवस्था, इलाख्यांची, देवी – देवतांची, भाषा – संस्कृती आणि निसर्गातील डोंगर, दऱ्या, झऱ्यांना आणि झाडांना देव मानणारी कृषी पूर्व समाज व्यवस्था एकदा आपल्या मुलांना आपण दाखविली पाहिजे.

            अन्यथा मध्य भारतातील अबुझमाडच्या पायथ्याशी असलेल्या गडचिरोली जिल्ह्याचे सौंदर्य, संपत्ती आणि उच्च कोटीची मानवी संस्कृतीने नटलेले वैभव समजून घ्यायला पुन्हा ब्रिटीश अधिकारी एलवीन वाॅरीयर आणि ग्रिगसन यांना धुंडाळावे लागेल. आणि त्यांच्या पुस्तकांत माडिया गोंड समजून घ्यायची वेळ येईल.

          करीता देशभरातील पर्यावरणप्रेमी, लोकशाहीवादी नागरिक, पत्रकार, वकील, सामाजिक संघटना आणि विविध राजकीय पक्षांचे नेते, कार्यकर्ते यांना आवाहन करतो की, दिनांक १,२,३ जानेवारी २०२५ रोजी होणाऱ्या ‘बाबलाई माता’ जत्रा, बेज्जूर ता.भामरागड आणि दिनांक ५, ६, ७ जानेवारी २०२५ रोजी होणाऱ्या ठाकुरदेव यात्रा, सुरजागड ता. एटापल्ली या वार्षिक पारंपरिक महोत्सवाला आपल्या कुटूंब, मित्र – मैत्रीणींसह आवर्जून हजेरी लावावी, असे आवाहन खदानविरोधी आंदोलनाच्या वतीने शेतकरी कामगार पक्षाच्या आदिवासी, भटके – विमुक्त आघाडीचे प्रदेशाध्यक्ष भाई रामदास जराते, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य कार्यकारिणी सदस्य काॅ. डाॅ. महेश कोपूलवार, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव काॅ. अमोल मारकवार यांनी केले आहे.