युवराज डोंगरे
उपसंपादक
खल्लार पोलिस स्टेशन हद्दीतील सांगवा फाट्यावर अवैध वाळू तस्करी करणाऱ्या भरधाव ट्रॅक्टरने शेतात जाणाऱ्या बैलबंडीला जोरदार धडक दिली या धडकेत बैलबंडीत बसलेले तिघे जखमी झाले एक जण गंभीर जखमी झाला आहे. तर दोन जण किरकोळ जखमी झाले असून गंभीर असलेल्या जखमीस अमरावती येथे खाजगी दवाखान्यात हलविण्यात आले आहे.हि घटना आज (28) डिसेंबरला सकाळी 5:30 वाजताच्या सुमारास घडली.
दिलीप निरंजन सावळे (42),संतोष सुखदेव झोड (45),पुरुषोत्तम हरिभाऊ मदनकर (60) हे तिघेही रा. सांगवा तिघेजण शेतातील कामासाठी बैलबंडीत बसून जात असतांना भरधाव वेगाने अवैध वाळू घेऊन जात असलेल्या निळ्या रंगाच्या विना नंबरच्या ट्रॅक्टरने जोरदार धडक दिली या धडकेत तिघेही जखमी झाले असून दिलीप निरंजन सावळे गंभीर जखमी झाले असून दोन जण किरकोळ जखमी झाले आहेत. घटनास्थळावरुन ट्रॅक्टर चालक पसार झाला.
दरम्यान घटनेची माहिती गावात पसरताच घटनास्थळी नागरिकांनी गर्दी केली होती. जोपर्यंत ट्रॅक्टर चालकास अटक होत नाही तोपर्यंत ट्रॅक्टर पोलिसांच्या ताब्यात देणार नाही अशी भूमिका नागरिकांनी घेतल्याने तणाव निर्माण झाला होता.
ट्रॅक्टर व ट्रॉली खल्लार पोलिसांनी ताब्यात घेतली असून ट्रॅक्टर चालकाचा शोध घेणे सुरु आहे. याप्रकरणी अज्ञात चालकाविरुध्द खल्लार ठाण्यात कलम 281,325,125(अ ), 125(ब )व्ही एन एस मोटर वाहन कायदा 50/177 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून फरार ट्रॅक्टर चालकाचा शोध घेणे सुरु असल्याची माहिती खल्लार पोलिसांनी दिली.
बॉक्स
चंद्रभागा व पूर्णा नदीपात्रातून दररोज रात्रीच्या सुमारास अवैध वाळूची तस्करी मोठया प्रमाणावर केली जात असून शासनाला लाखो रुपयांचा चुना हे वाळू तस्कर लावत आहेत. याकडे महसूल विभागाने लक्ष देऊन वाळू माफियावर प्रतिबंध घालून शासनाची होत असलेली फसवणूक थांबविने गरजेचे आहे.वाळू माफियांची हिम्मत ही दिवसेंदिवस वाढत चालली असून भविष्यात वाळू माफियांच्या मगरुरीमुळे मोठी घटना घडू शकते. त्यामुळे मस्तावलेल्या वाळू माफियांवर कडक कारवाई करणे गरजेचे आहे.