शुभम गजभिये
विशेष प्रतिनिधी
चिमूर :- स्वातंत्र्य सेनानी,महान साहित्यिक,महाराष्ट्र माऊली साने गुरुजी यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त राष्ट्र सेवा दल,वामनराव पाटील स्मृती प्रतिष्ठान,समता सैनिक दल,राष्ट्रीय ओबीसी महासंघ, शिक्षक भारती,छात्रभारती आणि समविचारी संस्था, संघटना यांचे समन्वयातून विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या निरालस कार्यकर्त्यांना रविवार, दिनांक २९ डिसेंबर २०२४ रोजी सकाळी ११ वाजता राष्ट्रसंत तुकडोजी मूकबधिर विद्यालय चिमूर येथे आयोजित सोहळ्यात सामाजिक चेतना पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.
पुरस्कार वितरण समारंभाचे अध्यक्षस्थानी राष्ट्रीय ओबीसी महासंघ चिमूर तालुका कार्याध्यक्ष प्रभाकर पिसे असतील.प्रमुख अतिथी म्हणून वामनराव पाटील स्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रसिद्ध विधीज्ञ ऍड. भूपेश पाटील,सामाजिक कार्यकर्ते डॉ.आशिष पाटील,सामाजिक कार्यकर्ते महादेवराव पिसे,धम्मचारी पद्मरत्न, सामाजिक कार्यकर्ते मारोतराव अतकरे उपस्थित राहणार आहेत.
साने गुरुजी सामाजिक चेतना पुरस्कार प्रबोधनाचे कार्य करणारे सुधाकर चौखे,सामाजिक कार्यकर्ते आणि समता सैनिक दलाचे हरी मेश्राम,ओबीसींमध्ये जनजागृतीचे कार्य करणारे रामदास कामडी,मतीमंदांच्या पुनर्वसनाचे कार्य करणारे शुभम पसारकर,आत्मसंरक्षणासाठी कराटेचे प्रशिक्षण देणारे डॉ.सुशांत इंदूरकर, शिक्षणक्षेत्रात कार्यरत सुनीता खोब्रागडे यांना जाहीर करण्यात आला आहे,अशी माहिती सुरेश डांगे यांनी दिली आहे.
पुरस्कार वितरण समारंभाला उपस्थित राहण्याचे आवाहन राष्ट्र सेवा दल,वामनराव पाटील स्मृती प्रतिष्ठान,समता सैनिक दल, राष्ट्रीय ओबीसी महासंघ,शिक्षक भारती,छात्र भारतीच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.