
रामदास ठुसे
नागपूर विशेष विभागीय प्रतिनिधी
जून्या काळात दुकानांमध्ये पाट्या असायच्या, ग्राहक देवो भव: आजही पाट्या असतात पण त्या आपण सिसिटिव्हीच्या निगराणीत आहात म्हणजे कुठेतरी विश्वासार्हतेला तडा जाऊ लागल्याचे हे स्पष्ट संकेत असून व्यापाऱ्यांनी आपल्या ग्राहकांकडे बघण्याचा त्यांचा दृष्टीकोन बदलला त्याचे स्वरूप बदलले तसेच आज आपल्याला कोणतीही वस्तू खरेदी करताना आपलाही दृष्टिकोन बदलण्याची गरज आहे आणि ग्राहक म्हणून आपल्याला मिळालेल्या हक्कासाठी लढा देण्यासाठी सजग ग्राहक बनून डोळसपणे व्यवहार करण्याची गरज आहे, परंतू आपण नेहमीचा दुकानदार , संबंधातील व्यावसायिक ,नेहमीचा सेवा देणारा म्हणून त्यांना झुकते माप न देता व्यवहार करण्याची व आपली फसवणूक टाळण्याची गरज असल्याचे प्रतिपादन दीपक देशपांडे यांनी आपल्या प्रबोधनातून उपस्थित प्रेक्षकांना केले.
तहसील कार्यालय सावली येथील प्रशासकीय सभागृहात आयोजित राष्ट्रीय ग्राहक दिन समारंभात प्रांजली चिरडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या कार्यक्रमाला दीपक देशपांडे अध्यक्ष मूल तालुका ग्राहक पंचायत मूल,हे प्रमुख अतिथी व मार्गदर्शक म्हणून तर अशोक मैदमवार उपाध्यक्ष, रमेश डांगरे सचिव, तुळशीराम बांगरे संघटक, डॉ. आनंदराव कुळे, कार्य. सदस्य , डॉ षडाकांत कवठे, व कु. राखी देशभ्रतार ,निरीक्षण अधिकारी सावली आदी मान्यवर अतिथी म्हणून मंचावर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात पुरवठा निरीक्षक सावली कु.ज्योत्स्ना रामटेके यांनी ग्राहक गीत गायनाने केली, त्यानंतर पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले.
कार्यक्रमाची प्रस्तावना करताना अशोक मैदमवार यांनी ग्राहक संरक्षण अधिनियमाची सुरुवात आणि ग्राहक दिनाचे महत्त्व विशद केले,तर डॉ आनंदराव कुळे यांनी ग्राहक म्हणून आपण कशाप्रकारे काळजी घ्यावी याबाबत माहिती दिली.
रमेश डांगरे यांनी ग्राहक शब्दाची व्याप्ती स्पष्ट करीत ग्राहकांच्या फसवणुकीच्या वेगवेगळ्या प्रकाराबाबत सविस्तर माहिती देताना ग्राहकांची नित्याच्या व्यवहारात कशी फसवणूक केली जाते हे पटवून देण्यासाठी सजग ग्राहक बनून व्यवहार करण्याची आवश्यकता पटवून दिली.
कु.राखी देशभ्रतार निरीक्षण अधिकारी सावली यांनी (तहसीलदार यांना महत्वाचे काम आल्यामुळे) अध्यक्षीय समारोप करताना ग्राहक संरक्षण अधिनियम आणि त्यातील अधिकार यांबाबत माहिती देत मंचावरील उपस्थित मान्यवरांनी दिलेली माहिती आपल्या आणि आपल्या कुटुंबाची आणि परिचितांची फसवणूक होणार नाही यासाठी उपयोगात आणण्याची गरज असल्याचे प्रतिपादन केले.
आपल्या सविस्तर मार्गदर्शनात ग्राहक, ग्राहक पंचायत, ग्राहक अधिनियम पूर्वेतिहास, ग्राहक संरक्षण कायदा १९८६ते २०१९ चा प्रवास आणि बदललेले स्वरूप, कायद्याची वाढलेली व्याप्ती आणि २०१९च्या कायद्याने ग्राहकांना मिळालेले अधिकार याबाबत दीपक देशपांडे यांनी ग्राहकांना पटेल अशा छोट्या छोट्या उदाहरणातून पटवून देण्याचा प्रयत्न केला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन कु.ज्योत्स्ना रामटेके पुरवठा निरीक्षक सावली यांनी केले,या कार्यक्रमाला सावली तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदार, ग्राहक , कर्मचारी वृंद, नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.