सरपंच अपात्र, अपर आयुक्तांचा न्यायनिवाडा… — पदाचा दुरूपयोग केल्याचा आरोप…

ऋषी सहारे 

  संपादक

गडचिरोली :- आरमोरी तालुक्यातील ठाणेगाव येथील सरपंच वासुदेव मंडलवार यांनी नियमबाह्य कामे करून भ्रष्टाचार केल्याचा ठपका ठेवत अपर आयुक्तांनी मंडलवार यांना अपात्र घोषित केले आहे. ग्रामपंचायत सदस्य स्नेहा गोपाल भांडेकर यांनी यासंदर्भात तक्रार दाखल केली होती. त्या तक्रारीवर न्यायनिवाडा करताना अपर आयुक्तांनी हा निर्णय दिला.

           २०२०-२१ या कालावधीत मंडलवार हे ठाणेगाव ग्रामपंचायतवर निवडून आले आहेत. दरम्यान सरपंच म्हणून मंडलवार यांनी आरमोरी पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांकडे निविदा मंजूर करण्याआधीच काम केले. सरपंच आणि सचिवांनी कोणतीही जाहीरात न काढता निविदा मंजूर करण्याआधीच विहिरीवर जाळी बसविण्याचे काम केले.

           त्या कामाची रक्कम दि.१९ एप्रिल २०२२ च्या मासिक सभेत १५ व्या वित्त आयोगाच्या निधीमधून खर्चास मंजुरी प्रदान केली. त्यानंतर त्याच कामाची रक्कम १५ व्या वित्त आयोगाच्या निधीमधून खर्च न करत, मासिक सभेत परवानगी न घेता २१ जुलै २०२३ च्या मासिक सभेत विहिर देखभाल व दुरूस्ती म्हणून पाणी पुरवठा निधीतून खर्च केल्याचे दाखविण्यात आले. ते काम २५ हजार रुपयांच्या वरील रकमेचे असल्याने महाराष्ट्र ग्रामपंचायत लेखा संहिता २०११ अंतर्गत कलम ५० अन्वये कामाचे अंदाजपत्रक तयार करून त्यास तांत्रिक मान्यता प्राप्त करणे आवश्यक होते. परंतू अंदाजपत्रकच तयार केले नाही आणि निविदासुद्धा काढली नाही.

             याशिवाय प्राथमिक आरोग्य केंद्राकरिता आणि अंगणवाडीतील साहित्य खरेदी करतानाही सरपंच आणि ग्रामविकास अधिकाऱ्यांनी संगनमत करून साहित्य खरेदी केल्याचे दिसून आले. याप्रमाणे इतरही अनेक कामांत नियमांना डावलल्याचे गटविकास अधिकाऱ्यांनी केलेल्या चौकशीत आढळले.

            विशेष म्हणजे जेम्स प्रणालीद्वारे खरेदी करण्यात आलेल्या साहित्यापेक्षा निकृष्ट दर्जाच्या साहित्याचा पुरवठा करण्यात आला आहे. याशिवाय साहित्य आणि साहित्याच्या दरातही तफावत असल्याचे स्नेहा भांडेकर यांनी निदर्शनास आणून दिले. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार गटविकास अधिकाऱ्यांनी चौकशी केली.

           त्यात मंडलवार यांच्या कार्यकाळातील कामात नियमांना डावलल्याचे आणि भ्रष्टाचार केल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे अपर आयुक्त डॅा.माधवी खोडे चवरे यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिलेला चौकशी अहवाल ग्राह्य धरत भांडेकर यांचा तक्रार अर्ज मान्य केला. त्यामुळे सरपंच मंडलवार अपात्र ठरले आहेत.