दिक्षा ललिता देवानंद कऱ्हाडे
वृत्त संपादिका
पुणे, २१ डिसेंबर २०२४
राज्यात गेल्या काही वर्षांपासून सुरू असलेला मराठा आरक्षणाचा लढा नव्याने सुरू होणार आहे. मराठा आरक्षण आंदोलनाचे प्रणेते मनोज जरांगे पाटील लवकरच अंतरवाली सराटीत पुन्हा उपोषणावर बसणार आहे.
या आंदोलनाला ओबीसी बांधवांचे समर्थन राहील,असे वक्तव्य इंडिया अगेन्स्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि ओबीसी नेते हेमंत पाटील यांनी शनिवारी (ता.२१) व्यक्त केले. आतापर्यंत सहा वेळा उपोषण करणारे जरांगे पाटील यांना सातव्यांना मोठे यश मिळेल,असा विश्वास यानिमित्ताने पाटील यांनी व्यक्त केला.
मराठा समाजाला विकासाच्या मुख्यप्रवाहात आणण्यासाठी त्यांना आरक्षणाची नितांत आवश्यकता आहे. कुणबी प्रमाणपत्र मराठ्यांना मिळावीत तसेच ओबीसींप्रमाणे शिक्षणात आणि नोकऱ्यांमध्ये आरक्षण देण्याची मुख्य मागणी जरांगे यांची आहे.पिछाडलेल्या समाजाला विकासधारेत आणण्यासाठी आरक्षण मिळणे आवश्यक आहे.
देवेंद्र फडणवीस सरकारने यापूर्वी मराठा आरक्षण देवू केले होते. पंरतु, गेल्या काळात बदललेली सरकारे आणि राजकीय घडामोडीमुळे आरक्षणाचा मुद्दा मागे पडला. आता फडणवीस पुन्हा मराठा समाजाला ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लागू देता आरक्षणाचा मार्ग खुला करतील, असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला.
जरांगे पाटील यांनी आता या मुद्द्यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याच्या अनुषंगाने सरकारसोबत वाटाघाटी करण्याचे आवाहन देखील पाटील यांनी यानिमित्ताने केले.
मराठ्यांना कुणबी म्हणून मान्यता देण्यासाठी तयार असलेला मसुदा अधिसूचित करण्याची तसेच सगे सोयरे संबंधी हैद्राबाद, सातारा आणि बॉम्बे गॅझेटच्या आधारे मराठ्यांना कुणबी म्हणून घोषित करावी, या जरांगेच्या मागणीचे पाटील यांनी समर्थन केले.
ओबीसी विरुद्ध मराठा असा संघर्ष टाळण्यासाठी राज्य सरकारने आरक्षणासाठी मध्यममार्ग काढत योग्य तोडगा काढण्याची गरज असल्याचे मत देखील पाटील यांनी व्यक्त केले.