आळंदीत व्याख्यानात प्रा.वसंत हंकारे यांच्याकडून ‘बाप समजावून घेताना’ हजारो विद्यार्थ्यांना भावना अनावर….

दिनेश कुऱ्हाडे 

   उपसंपादक

आळंदी : आईच्या खांद्याला खांदा लावून शेतात राब राब राबतो तो बाप असतो, तुमच्या इच्छा आकांक्षा पुर्ण करण्यासाठी स्वतः फाटके कपडे घालेल पण तुम्हाला नवीन कपडे देईल तो बाप असतो, असे प्रतिपादन प्रसिद्ध व्याख्याते प्रा.वसंत हंकारे यांनी केले.

          तिर्थक्षेत्र आळंदी येथील श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेत समर्थ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शिवाजीराव गवारे व सचिव विद्याताई गवारे यांच्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांसाठी बाप समजून घेताना…या विषयावर ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव अजित वडगावकर होते.

        यावेळी खजिनदार डॉ.दिपक पाटील, समर्थ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शिवाजीराव गवारे, सचिव विद्याताई गवारे, प्राचार्य सुर्यकांत मुंगसे, अनिल वडगावकर, राज पवळे, आनंद वडगावकर तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी व पालक बहुसंख्येने उपस्थित होते. 

       वसंत हंकारे पुढे म्हणाले की, मुलींनो प्रेमाच्या खोट्या जाळ्यात अडकून स्वताचे आयुष्य बरबाद करु नका.१५ ते २० वर्ष आपल्याला सांभाळलेले असते त्याच्या अन्नात प्रेम करुन माती कालवू नका. आपले आई वडील समाजात ताठ मानाने फिरले पाहिजे, ही मुलगी, हा मुलगा माझा आहे असे कर्तृत्व, तुमचे वागणे, जगणे असले पाहिजे, चुकीच्या वागण्याने आपला बाप अर्धमेला होतो. त्याला समाजात तोंड दाखवायला जागा राहत नाही असे वागू नका.

         रात्र रात्र आपला बाप आपल्यासाठी राबत असतो हे विसरू नका आई वडीलासारखे खरे प्रेम आपल्यावर कोणीही करु शकत नाही. हे व्याख्यान सुरू असताना दोन हजार विद्यार्थी व पालक तसेच उपस्थित प्रत्येक जण भारावून गेला होते.

         अनेक विद्यार्थ्यांना आपल्या भावना अनावर झाल्या, अनेक विद्यार्थ्यांनी अश्रुवाटे आपल्या भावना व्यक्त केल्या. हंकारे सरांनी या व्याख्यानाद्वारे उपस्थित प्रत्येकाच्या काळजाला हात घातला. दोन तास सर्व श्रोते मंत्रमुग्ध होऊन या व्याख्यानाचा आस्वाद घेत होते.