शुभम गजभिये
विशेष प्रतिनिधी…
खराब रस्त्याने जाताना तोल जाऊन व दुचाकीवरुन पडून आदिवासी आश्रम शाळेच्या कर्मचाऱ्याला आपला जीव गमवावा लागल्याची घटना भद्रावती शहरातील देवालय सोसायटीच्या रस्त्यावर दि.१४ डिसेंबर रोजी रात्री घडली.
प्राप्त माहितीनुसार,येथील विंजासन रस्त्यापासून देवालय सोसायटीकडे जाणारा रस्ता अतिशय खराब आहे.या रस्त्यावरील गिट्टी उखडलेली आहे.
त्यामुळे या रस्त्याने जाताना नागरिकांना त्रास सहन करावा लागतो.दि.१४ डिसेंबर रोजी रात्री दिलीप सिडाम (५२) हे या रस्त्याने जात असताना त्यांची दुचाकी घसरल्याने अपघात झाला.
त्यांची गाडी स्लिप होऊन ते रस्त्याच्या कडेला साचलेल्या पाण्यात पडले.सुमारे एक तास कोणाचेही लक्ष न गेल्याने त्यांना मदत मिळाली नाही.
लोकांच्या निदर्शनास आल्यावर त्यांना तात्काळ येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.मात्र उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
दिलीप सिडाम हे जिवती येथील शासकीय आश्रम शाळेत कार्यरत होते.त्यांच्या मांगली (रै.) या मूळ गावी त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले.
सिडाम ४ वर्षांपासून देवालय सोसायटी भद्रावती येथे राहत होते.तेथे त्यांचे सर्वांशी मैत्रीपूर्ण संबंध होते.त्यांच्या पश्चात पत्नी व दोन मुली असा परिवार आहे. त्यांच्या निधनामुळे कुटुंब,नातेवाईक,सहकारी आणि देवालय वासीयांमध्ये शोककळा पसरली आहे.