दिनेश कुऱ्हाडे
उपसंपादक
पुणे : ‘तरुणांचा देश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारतामध्ये कालांतराने ज्येष्ठांची संख्या वाढणार आहे. त्यामुळे सेवाभावी वृत्तीने काम करणाऱ्या संस्थांनी ज्येष्ठांच्या गरजा आणि सेवा पुरवण्यासाठी काम करणे आवश्यक आहे. ज्येष्ठांची सेवा ही ईश्वरसेवाच आहे’, असे मत ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी व्यक्त केले.
इंटरनॅशनल लाँजिव्हीटी सेंटरच्या वतीने डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या हस्ते वानप्रस्थाश्रम संस्थेला प्रदान करण्यात आलेला बी. जी. देशमुख उत्कृष्ट ज्येष्ठाश्रम पुरस्कार संस्थेचे सुरेश साखवळकर, ऊर्मिला छाजेड आणि सुनंदा जप्तीवाले यांनी स्वीकारला. त्या वेळी माशेलकर बोलत होते. भारती विद्यापीठाचे कुलपती डॉ. शिवाजीराव कदम, कुलगुरू डॉ. विकास सावजी, इंटरनॅशनल लाँजिव्हीटी सेंटरचे अध्यक्ष जयंत उमराणीकर या वेळी उपस्थित होते.
डॉ. माशेलकर म्हणाले, ‘अनुभवाचा प्रगल्भ खजिना असलेल्या ज्येष्ठांचे मार्गदर्शन घेतल्यास युवा पिढीला आयुष्यात फायदा होईल. परिस्थिती अनुकूल करण्यासाठी शिक्षणाची कास धरणे आवश्यक आहे. माझ्या आईकडे शिक्षण नव्हते. म्हणून तिला मूलभूत गरजांसाठीसुद्धा संघर्ष करावा लागला. मी खूप शिकावे अशी इच्छा तिने उराशी बाळगली. मला २५ मानद पदव्या मिळाल्या तेव्हा तिला खूप समाधान वाटले.’