दिनेश कुऱ्हाडे
उपसंपादक
आळंदी : संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त बुधवारी (दि.२७) माउलींच्या पालखीची रथातून ग्रामप्रदक्षिणा काढण्यात आली. या रथोत्सवाने अवघी अलंकापुरी भक्तीरसात नाहली होती. रथात विराजमान माउलींच्या मुखवट्याचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी रथाच्या दोन्ही बाजूस वारकरी भाविकांनी तसे आळंदी व पंचक्रोशीतील नागरीकांनी गर्दी केली होती.
“संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांचे जन्मोत्सव सप्त शतकोत्तर वर्ष (७५० वे वर्षे) सुरू असून त्यानिमित्ताने वर्षभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन आळंदी देवस्थानच्या वतीने करण्यात आले आहे. सप्त शतकोत्तर वर्षाचे औचित्य साधून तसेच समाधी सोहळ्यात आळंदी देवस्थानने भाविकांसाठी अनोखी पर्वणी उपलब्ध करून दिली आहे.
दरवर्षी चांदीच्या रथातून होत असणारा हा रथोत्सव यंदा १५० वर्षे जुना लाकडी रथातून होणार आहे. तब्बल २३ फूट उंच आणि अंदाजे १ हजार २०० किलो वजन असलेल्या या रथातून माउलींचा आळंदी शहरातून रथोत्सव पार पडला आहे.
यावेळी प्रमुख विश्वस्त राजेंद्र उमाप, विश्वस्त योगी निरंजननाथ, डॉ.भावार्थ देखणे, पालखी सोहळामालक बाळासाहेब आरफळकर, व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर, राजाभाऊ चोपदार, बाळासाहेब चोपदार, मानकरी साहिल कुऱ्हाडे, माजी नगराध्यक्ष राहुल चिताळकर, मंगेश आरु, स्वप्नील कुऱ्हाडे, वरीष्ठ पो.नि.भिमाजी नरके, तसेच आळंदीकर ग्रामस्थ व वारकरी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
माउलींच्या पालखी टाळ-मृदंगाच्या गजरात साडेचार वाजेच्या दरम्यान मुख्य महाद्वारातून ग्रामप्रदक्षिणेसाठी बाहेर पडली. पावणेपाच वाजता पालखी गोपाळपुरा येथील श्रीकृष्ण मंदिरात दाखल झाली. गोपालकृष्ण मंदिरात विसावल्यानंतर सव्वापाच वाजता पालखीतील माउलींच्या चांदीच्या मुखवट्याला लाकडी रथावर विराजमान करण्यात आले.
तद्नंतर आरती होऊन पालखी टाळ- मृदंगाच्या गजरात नगरप्रदिक्षणेसाठी मार्गस्थ झाली. माऊलींच्या पालखी सोहळ्यातील मानाच्या दिंड्यांमधील वारकरी पालखी पुढे चालत होते. गोपाळपुरा रस्त्यावरून पालखी वडगाव चौकात आली असता दिंडीतील वारकर्यांनी फेर धरत टाळ-मृदंगाचा गजर केला. रथासमोर रांगोळीच्या पायघड्या घालण्यात आल्या होत्या. माउलींचा रथ सायंकाळी उशिरा मंदिरात परतला.
पहाटे दोन वाजता पवमान अभिषेक, दुधारती या नित्यपूजा विधीबरोबरच पहाटे तीन वाजता कार्तिकी द्वादशीची महापूजा प्रांताधिकारी यांच्या वतीने झाली.
यावेळी सायंकाळी बडवे यांच्या कडून किर्तन सेवा तसेच रात्री नऊ वाजता केंदुरकर यांची किर्तन सेवा संपन्न झाली. रात्री ११वा. खिरापत पुजन, प्रसाद वाटप करण्यात आले.