
दिक्षा ललिता देवानंद कऱ्हाडे
वृत्त संपादिका
मुंबई २४ नोव्हेंबर :- नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुक २०२४ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कडून विजयी झालेल्या ४१ आमदारांची बैठक आज २४ नोव्हेंबर २०२४ रोजी मुंबई स्थित पक्षाच्या कार्यालयात पार पडली.
या बैठकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष ना.अजितदादा पवार यांची विधीमंडळ गटनेता पदी एकमताने निवड करण्यात आली. अजितदादा पवार हे बारामती मतदार संघातून प्रचंड मताधिक्याने निवडून आले आहेत तर अमरावती विधानसभा मतदार संघातून निवडून आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या आ.सौ. सुलभाताई खोडके या बैठकीला उपस्थित असल्याने पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष ना.अजितदादा पवार, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सुनीलजी तटकरे यांनी आ.सौ. सुलभाताई खोडके यांचे स्वागत, सत्कार व अभिनंदन केले.
या बैठकीला पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष खा. प्रफुल्लभाई पटेल, जेष्ठ नेते छगनराव भुजबळ, माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे, हसन मुश्रीफ, संजय खोडके आदींसह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते मंडळी व महाराष्ट्रातून विजयी झालेल्या राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांची देखील उपस्थिती होती.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुक २०२४ मध्ये महायुतीसोबत निवडणूक लढवितांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला मिळालेल्या ५५ जागांपैकी ४१ जागांवर विजय मिळविला आहे. अमरावती विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सौ. सुलभाताई संजय खोडके ६०,००८७ मताधिक्याने विजयी झाल्यात. या विजयाने आ.सौ. सुलभाताई खोडके तिसऱ्यांदा विधानसभेत पोहोचल्या आहेत.
इतकेच नाही तर विधानसभेच्या निवडणुकीत विदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने अमरावतीची जागा काबीज करीत ५ जागांवर विजय मिळवला. ज्यामध्ये सौ.सुलभाताई खोडके या एकमेव महिला आमदार म्हणून निवडून आल्या आहेत.याबद्दल सुद्धा आ.सौ. सुलभाताई खोडके यांचे बैठकीत विशेष अभिनंदन करण्यात आले.
दरम्यान बैठकीमध्ये विधानसभा निवडणुकीवर सुद्धा चर्चा करण्यात आली असून थोड्या फरकाने ज्या-ज्या जागा गमावण्यात आल्या असून, त्याबद्दल सुद्धा कारण-मिमांसा करण्यात आली.
परंतु महायुतीसोबत लढत असतांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला मिळालेल्या ५५ जागांपैकी ४१ जागा जिंकून पक्षाने दमदार कामगिरी केल्याचा आनंद सुद्धा यावेळी दिसून आला. यावेळी सर्व विजयी उमेदवारांनी ना.अजितदादा पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास दर्शवित त्यांची पक्षाच्या विधीमंडळ गटनेता पदी निवड करण्यात आली.
यावेळी अमरावती मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या आमदार सौ.सुलभाताई खोडके यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधिमंडळ गटनेता ना.अजितदादा पवार यांचे अभिनंदन केले.