रामदास ठुसे
विशेष विभागीय प्रतिनिधी
चिमूर :-
विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी २० नोव्हेंबर रोजी चिमूर विधानसभा क्षेत्रात रात्री ७.४५ वाजेपर्यंत मतदान पार पडले.भाजपचे आमदार बंटी भांगडीया व काँग्रेसचे डॉ.सतीश वारजुकर यांच्यात थेट लढत झाली.
विधानसभा क्षेत्रातील एकूण २ लाख ८० हजार ८२७ मतदारांपैकी तब्बल २ लाख ३० हजार १३३ मतदारांनी मताधिकार बजावला.
राज्यात करवीर विधानसभा क्षेत्रात पहिल्या क्रमांकाचे ८४.८१ टक्के, तर दुसऱ्या क्रमांकाचे ऐतिहासीक ८१.९५ टक्के एवढे मतदान चिमूर विधानसभा क्षेत्रात झाले आहे.
चिमूर विधानसभा मतदारसंघात चिमूर,नागभीड या तालुक्यासह ब्रह्मपुरी तालुक्यातील अन्हेर नवरगाव महसूल मंडळाचा समावेश आहे. या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व मागील दहा वर्षांपासून युवाशक्तीतून भाजपवासी झालेले कीर्तिकुमार उर्फ बंटी भांगडीया करीत आहेत.
त्यांनी दहा वर्षांत रस्ते,पूल, सभागृह,शासकिय इमारती इत्यादीसह विकासकामांकरिता सर्वाधिक निधी आणला.मात्र,या दहा वर्षांत इतर विकासकामे करीत असताना रोजगार,शिक्षण व आरोग्याच्या विकासाकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे.
या निवडणुकीत विरोधकांचा हाच प्रचाराचा मुद्दा होता. भांगडिया यांच्या प्रचाराकरिता खुद्द प्रधानमंत्री नरेंद्र मोदी,तर वारजुकर यांच्या प्रचाराकरिता काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी आले. त्यामुळे चुरस अधिकच वाढली होती.
लोकसभेत चिमूर विधानसभा क्षेत्रात मिळालेल्या मताधिक्याने काँग्रेसला संजिवनी मिळाली होती. काँग्रेस पक्षाकडून उमेदवारीकरिता इच्छुक असलेले व मागील निवडणुकीत अपक्ष लढलेले धनराज मुंगले,वडेट्टीवार समर्थक सर्वजण एकीने कामाला लागले.
वंचित बहुजन आघाडीचा कमी झालेला प्रभाव,बहुजन समाज पक्षाचा उमेदवार नसणे,हे काँग्रेसच्या पथ्यावर पडले. यामुळे भांगडिया व वारजुकर यांच्यात थेट लढत झाली. याचा परिणाम दोन्ही पक्षातील तसेच मित्र पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्ते मतदान सर्वाधिक व्हावे,यासाठी प्रयत्न केले.त्यामुळे ऐतिहासीक ८१.९५ टक्के एवढे मतदान झाले.
मागील विधानसभा निवडणुकीत ७५.०१ टक्के मतदान झाले होते.हा मतांचा वाढलेला टक्का कोणाच्या पारड्यात पडेल हे २३ नोव्हेंबरला होणाऱ्या मतमोजणीत दिसुन येईल. मात्र, दोन्ही पक्षांकडून आमचाच विजय असल्याचा दावा केला जात आहे.