निवडणूक कामात हयगय करणाऱ्या वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल…. –कर्तव्यात कसूर केल्यास कोणाचीही गय केली जाणार नाही :- जिल्हाधिकारी..

ऋषी सहारे 

   संपादक

गडचिरोली : निवडणूक कामात हयगय केल्याप्रकरणी पोर्ला येथील वनपरिक्षेत्र अधिकारी राकेश मडावी यांच्यावर गडचिरोली पोलिस स्टेशनमध्ये काल रात्री भारतीय न्याय संहिता 2023 च्या कलम 223 अन्वये व लोकप्रतिनिधित्व अधिनियमाच्या कलम 134 (1) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.(एफआयआर क्रं.891)

           श्री मडावी यांची 68- गडचिरोली विधानसभा संघातील पोर्ला क्षेत्रासाठी क्षेत्रीय अधिकारी म्हणुन नेमणूक करण्यात आली होती.

           दिनांक 11 व 13 नोव्हेंबर रोजीच्या प्रशिक्षण सत्रास ते अनुपस्थीत होते व त्यामुळे मतदान यंत्र तयार करण्याच्या कामात व्यत्यय निर्माण झाला तसेच त्यांनी अनुपस्थित असतांनांच्या तारखेसाठी दिनांक 14 नोव्हेंबर रोजी स्वाक्षरी केल्या तसेच सदर दिवशी प्रशिक्षण न घेता निघुन गेले.

            निवडणूक कर्तव्यात कसूर केल्याचे कारणास्तव निवडणूक निर्णय अधिकारी राहुल मीना यांचे वतीने नायब तह‌सिलदार अल्पेश बारापात्रे यानी पोलिस स्टेशनला तक्रार दाखल केली आहे. निवडणूक कर्तव्यावरील कोणत्याही अधिकारी कर्मचाऱ्यांनी नेमुण दिलेल्या जबाबदाऱ्या चोखपणे बजावाव्या, कर्तव्यात कसूर केल्यास कोणाचीही गय केली जाणार नाही असा इशारा जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी संजय दैने यांनी दिली आहे.